लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यामध्ये सापडलेल्या बनावट औषधांच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य संस्थांमधील उपलब्ध साठा व त्याची गुणवत्ता तपासणीसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. मात्र मागील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणने खरेदी केलेल्या २२ हजार ३६७ औषधांपैकी अवघे आठ नमुने कमी दर्जाचे असल्याचे उघडकीस आले आहे, तर अद्यापही १ हजार ६१६ औषधांच्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. यामुळे स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात येत असलेल्या औषधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यातील सर्व रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी औषध खरेदीची जबाबदारी १५ ऑगस्ट २०२३ पासून महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणावर आहे. राज्यामध्ये काही महिन्यांपूर्वी विविध रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा साठा सापडला होता. या धर्तीवर प्राधिकरणने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील रुग्णालयांसाठी दोन वर्षांत खरेदी केलेल्या विविध प्रकारच्या औषधांच्या नमुन्यांची तपासणी केली. या तपासणीत २०२३-२४ मधील नमुन्यांपैकी तीन, तर २०२४-२५ मधील नमुन्यांपैकी पाच नमुने कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे.

प्राधिकरणाने २०२३-२४ मध्ये १२ हजार ७६७ प्रकारच्या औषधांची खरेदी केली हेाती. त्यापैकी १ हजार ८८४ औषधांचे नमुने एनएबीएल प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले होते. तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांपैकी १ हजार ७७२ प्रकारचे नमुने वापरण्यास योग्य असून तीन नमुन्यांचा दर्जा अयोग्य असल्याचे अहवालात म्हटले होते. यापैकी अद्याप १०९ नमुन्याचा अहवाल प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे २०२४-२५ मध्ये प्राधिकरणने खरेदी केलेल्या ९ हजार ६०० प्रकारच्या औषधांपैकी ४ हजार ६९१ नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार १७९ औषधे वापरण्यास योग्य असून पाच औषधांचा दर्जा अयोग्य असल्याचे आढळून आले. तसेच १ हजार ५०७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. एनएबीएल प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालानुसार अयोग्य दर्जा असलेल्या औषधांसंदर्भात सर्व रुग्णालयांच्या प्रमुखांना कळविण्यात आले असून, त्यांचा वापर थांबविण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणने वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हास्तरावरील रुग्णालयातील औषध भांडारमधील औषधांचे नमूने घेऊन ते एनएबीएल प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. यामध्ये आरोग्य विभागांतर्गत असलेल्या जिल्हा रुग्णालयांमधील औषध भांडारामधून ८६ प्रकारच्या औषधांचे नमूने तपासणीसाठी पाठवले होते. यापैकी ३२ औषधे वापरण्यास योग्य असून ५४ औषधांच्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयातील औषध भांडारामधून घेतलेल्या ६९ प्रकारच्या औषधांच्या नमुन्यांपैकी १४ नमुने वापरण्यास योग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र यापैकी ५५ औषधांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील आरोग्य संस्थात पुरवठा होत असलेली औषधे प्रयोगशाळेत काटेकोरपणे तपासून घ्यावीत. तसेच रूग्णाची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा -प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र