नाल्यांत ओल्या गाळाखाली मातीची टणक ढेकळे; गतवर्षीच्या नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह
मुंबईची नालेसफाई वेळेत होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच गतवर्षी किंवा त्याही आधीच्या वर्षांतील नालेसफाईवर प्रश्न उपस्थित करणारा प्रकार उजेडात येत आहे. अनेक ठिकाणी उपसलेल्या गाळाच्या खालच्या थरात मातीमिश्रित कचऱ्याची टणक ढेकळे आढळली आहेत. ही ढेकळे सुकलेला गाळ नाल्यातच साचून राहिल्याने तयार झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गतवर्षी या नाल्यांची सफाई झाली तरी होती का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
छोटय़ा नाल्यांच्या साफसफाईसाठी प्रशासनाने निविदा काढल्या होत्या. मात्र कंत्राटदारांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार फेरनिविदा काढल्यानंतरही कंत्राटदार कामे करण्यासाठी पुढे न आल्याने अखेर पालिकेच्या विभाग कार्यालयाच्या स्तरावर छोटय़ा नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला होता. या नाल्यांतून सुमारे १.६७ लाख मे. टन गाळ काढण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन १.६४ लाख दिवस कामगारश्रम (मॅनडेज) उपलब्ध करुन छोटय़ा नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मुंबईमधील छोटय़ा नाल्यांच्या सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नाल्यांमध्ये साचलेल्या गाळाची टणक ढेकळांमध्ये रूपांतर झाले आहे. ही ढेकळे फोडून बाहेर काढावी लागत आहेत. दरवर्षी नियमितपणे पावसाळ्यापूर्वी गाळ उपसण्यात येत होता, मग गाळाची ढेकळे कशी काय झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकूणच गतवर्षीच्या आणि त्याआधीच्या नालेसफाईभोवती संशयाचे धुके आहे.
छोटय़ा नाल्यांतून उपसलेला तब्बल ३५ हजार मे. टन गाळ मुंबईबाहेर वाहून नेण्यात आला आहे. उपसलेला गाळ नाल्याकाठी सुकल्यानंतर तो वाहून नेला जातो. त्यामुळे त्याचे वजनही कमी होते. म्हणजे नाल्यांतून अंदाजे ७० मे. टन ओला गाळ उपसल्याचा दावा काही अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. येत्या तीन-चार दिवसांमध्ये छोटय़ा नाल्यांतील आणखी सुमारे १० हजार मे. टन सुकलेला गाळ मुंबईबाहेरील कचराभूमीकडे वाहून नेण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. म्हणजे एकूण सुमारे ९० हजार मे. टनाच्या आसपास गाळ उपसण्यात येईल अशी शक्यता काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उपसलेल्या गाळाचे प्रमाण कमी आहे.
नाल्यांत वर्षांनुवर्षांचा गाळ?
गतवर्षी या नाल्यांची सफाई झाली तरी होती का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Written by प्रसाद रावकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-05-2016 at 03:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question raise over last year drain cleaning in mumbai