भक्ती परब
आर. के. स्टुडिओच्या परिसरात आठवणींची आवराआवर
‘शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वावर आयुष्यभर चित्रपटनिर्मितीचा वसा पाळत राहिलेले ‘शोमन’ राज कपूर यांचा चेंबूर येथील आर. के. स्टुडिओ अखेर टोलेजंग टॉवरसाठी जमिनीच्या पोटात गडप होणार आहे. राज कपूरच नव्हे तर हिंदी चित्रपटांचा ७१ वर्षांचा इतिहास गेली ७१ वर्षे आपल्या अंगाखांद्यावर घेऊन मिरवणाऱ्या या स्टुडिओत आता फेरफटका मारल्यावर दिसतात त्या भग्न इमारती, मोडक्यातोडक्या मूर्ती आणि राज कपूर यांचा पुतळा. राज कपूर यांचा हा पुतळा नव्या बांधकामानंतरही कायम राहील, असे सांगितले जात आहे. स्टुडिओतल्या उरल्यासुरल्या आठवणींची मात्र शेवटची आवराआवर सुरू झाली आहे.
राज कपूर यांनी १९४८ साली आर. के. बॅनर सुरू करतानाच चेंबूरच्या या स्टुडिओची उभारणी केली. ‘आर. के. बॅनर’च्या बहुतांश सर्वच चित्रपटांचे चित्रीकरण या स्टुडिओत झाले. ‘आवारा’, ‘बूटपॉलिश’, ‘जागते रहो’, ‘श्री ४२०’ ते अगदी ‘आ अब लौट चले’पर्यंतचे अनेक चित्रपट येथेच साकारले. अगदी २०१७पर्यंत येथील मुख्य स्टुडिओ कार्यरत होता. मात्र, त्याचवर्षी एका रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणादरम्यान लागलेल्या आगीत हा स्टुडिओ जळून खाक झाला. आता त्याच जळालेल्या स्टुडिओतील उरलेसुरले सामान जाळून त्याची राख करण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन आठवडय़ांनंतर या जागेवरील सर्व बांधकाम पाडले जाणार असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.
‘गोदरेज प्रॉपर्टीज लि.’ या कंपनीने आर. के. स्टुडिओ खरेदीचा करार केल्यानंतर स्टुडिओत कार्यरत असलेल्या १६ पैकी १२ वयस्क कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला. स्टुडिओतील बरेचसे सामान गोवंडी येथील ‘आर. के.’च्या नव्या ऑफिसमध्ये, संजना अपार्टमेंट येथे हलवण्यात आले आहे. स्टुडिओतील जुने कॅमेरे आणि इतर वस्तू कपूर कुटुंबीयांनी आधीच विकून टाकल्याचे समजते.
मुख्य इमारतीच्या दर्शनी भिंतीवर पूर्वी जुन्या चित्रपटांची पोस्टर्स लावलेली होती. ती सगळी काढण्यात आली आहेत. गेटमधून आत येताच दिसणारी शंकराची मूर्ती आणि बाजूलाच असलेला राज कपूर यांचा पुतळा या परिसराच्या पुनर्विकासानंतरही कायम राहील असे आता तरी सांगण्यात येत आहे. स्टुडिओच्या चारही बाजूंना कडुनिंब, फणस, वड अशा मोठमोठय़ा जुन्या झाडांनी सावली धरली आहे. मुख्य इमारतीच्या समोर आणि डाव्या बाजूला काही फुलझाडेही आहेत. स्टुडिओत आल्यावर राज कपूर यांचा डेरा असलेले कॉटेज नजरेस पडते. आज हे कॉटेज, मुख्य वास्तूमधील ऋषी कपूर, राजीव कपूर, रणधीर कपूर यांची कार्यालये आज भग्नावस्थेत शांतपणे उभ्या आहेत. इथेच स्टुडिओचे कार्यालयही होते. तिथे बुकिंगची कामे व्हायची. याच इमारतीत वरच्या मजल्यावर एक प्रिव्ह्यू थिएटर होते. तिथे राज कपूर आपल्या चित्रपट निर्मितीचा पहिला आविष्कार कर्मचारीवर्गाला दाखवायचे, असे तिथल्या एकाने सांगितले. मुख्य वास्तूच्या पुढे बंद पडलेले उपाहारगृहही आहे. त्यानंतर अजून एक इमारत दिसते. तिचीही पार वाताहत झाली आहे. न्यायालय म्हणून वापरण्यात येणारी ही स्टुडियोची जागा तिथे शेवटी अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, अशी माहिती मिळाली. आता ही सगळीच जागा कचऱ्याचे केंद्र झाली आहे.
जागा विकण्याचा निर्णय झाला तेव्हा कर्मचाऱ्यांपैकी कुणालाच सांगितले गेले नाही, अशी खंत एका कर्मचाऱ्याने बोलून दाखवली. ‘राज कपूरसारख्या दूरदृष्टी असलेल्या कलाकाराने पाहिलेले आणि प्रत्यक्ष साकार केलेले स्वप्न त्यांची आजची पिढी झटक्यात विकून मोकळी झाली,’ अशी एका रिक्षावाल्याची प्रतिक्रिया ‘आर.के.’चे महत्त्व सांगण्यास पुरेसे आहे. येत्या काही दिवसांत हा भव्य इतिहास इथेच जमीनदोस्त होईल. तेव्हा उरतील त्या या वास्तूच्या कॅमेऱ्यातील रिळांमध्ये कैद झालेल्या आठवणी!