विधानसभेच्या २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या व अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. पण काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला नाही. परिणामी राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावे लागले. अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ हे स्पर्धेत असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ही जबाबदारी आर. आर. पाटील यांच्यावर सोपविली. आपण काहीतरी वेगळे करायचे म्हणजे त्या कामाची ओळख कायमची राहिली पाहिजे, असे आर. आर. तेव्हा नेहमी खासगीत सांगत. ग्रामविकास खाते भूषविताना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात कामाची छाप पाडली होती. गृह खाते आबांकडे होते व या खात्याच्या माध्यमातून काहीतरी वेगळा आदर्श निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. असा कोणता निर्णय घेतला म्हणजे तो महाराष्ट्रातील जनतेच्या कायमचा लक्षात राहील, हा विचार तेव्हा आबांच्या डोक्यात घोळत होता. २००५ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात डान्सबारच्या संदर्भात शेकापचे विवेक पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. गृहमंत्री म्हणून त्याचे उत्तर आर. आर. यांना द्यायचे होते. गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी बिफ्रिंग केले. डान्स बारवरील बंदीचा निर्णय जाहीर केला तर, त्याची कोणती प्रतिक्रिया उमटेल याचा विचार सुरू झाला. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आर. आर. नेहमी शरद पवारांशी सल्लामसलत करीत. पण डान्सबार बंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी आपण पवारांशी चर्चा केली नव्हती, याची कबुली आर. आर. यांनी नंतर दिली होती. डान्सबार बंदीची घोषण करत आहे, अशी माहिती तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कानावर पाटील यांनी घातली. विलासरावांनी तात्काळ त्याला मान्यता दिली. डान्सबार बंदीचा ऐतिहासिक निर्णय मग आबांनी जाहीर केला. या निर्णयापासून आबांची प्रतिमा एकदमच उंचावली. महिला वर्गात आर. आर. लोकप्रिय झाले. थोडय़ाच दिवसांत झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आबा डोंबिवलीत आले असता फडके रोड या भाजपच्या बालेकिल्ल्यात झालेल्या सभेला एकच गर्दी उसळली होती. शुक्ल नावाची राष्ट्रवादीची तरुण कार्यकर्ती तेव्हा भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडून आली होती. डान्सबार बंदीच्या निर्णयापासून आबांचा आलेख उंचावत गेला. काही तरी वेगळा निर्णय घेण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले.
अजितदादांचा सल्ला मनावर घेतला असता तर ?
पश्चिम महाराष्ट्रातील असूनही साखर कारखाने, सूत गिरण्या किंवा सहकारी संस्थांच्या राजकारणापासून आर. आर. दूर होते. नेमक्या आबांच्या या त्रुटीवर सांगलीच्या सभेत अजित पवार यांनी बोट ठेवले होते. आर. आर. यांना सतत तंबाखू लागे. तंबाखू खाण्याचे सोडा आणि सहकारी संस्था उभारा, असा सल्ला अजितदादांनी तेव्हा सभेत दिला होता. आर. आर. यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याचा अजितदादांनी अपमान केल्याची टीका झाली होती. पण अजितदादांचा सल्ला तेव्हा आर. आर. यांनी मनावर घेतला असता तर.. आबांचे तंबाखूचे व्यसन शेवटपर्यंत राहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा