महिला प्रवाशांवर रात्री होणारे हल्ले टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांबाहेर प्रवासी वाहने आणि त्यातून जाणाऱ्या महिलांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी पोलिसांना दिले. तसेच महिलांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासंदर्भात हद्दीचे कारण पुढे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा आदेशही दिला आहे.
रात्री किंवा पहाटे टॅक्सी, रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांचा विनयभंग, अत्याचार, हल्ला यांसारख्या घटना गेल्या काही दिवसांत शहरात घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर हार्मनी फाऊंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई यांनी गृहमंत्री पाटील यांची भेट घेतली. या वेळी गृह, रेल्वे, परिवहन व पोलीस दलाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी प्रीपेड टॅक्सी सेवेप्रमाणेच सर्वच टॅक्सी, रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिला व  संबंधित टॅक्सी आणि रिक्षांचे चालक यांच्या नोंदी ठेवण्याची नवी पद्धत सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस तसेच पुणे आणि नागपूर रेल्वे स्थानकांच्या बाहेर ही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रात्री १० पासून सकाळी ६ पर्यंत येणाऱ्या रेल्वे गाडय़ांच्या वेळेत पोलिसांची गस्त वाढवा, टॅक्सी, रिक्षाच्या आतील भागात प्रवाशांना दिसतील अशा ठळकपणे वाहनांचे क्रमांक लावण्याच्या सूचनाही पाटील यांनी या वेळी केल्या.

Story img Loader