गडचिरोलीतील आदिवासींच्या वीजेचा प्रश्न मांडणाऱ्या गृहमंत्री आर.आर. पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडविल्याने पाटील यांनी राजीनामा द्यावा, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी येथे केले.
बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्र्यांनी आदिवासींच्या वीजबिलाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांची असंवेदनशीलता दिसून येते. अजित पवार यांनी या आधीही पाटील यांचा अपमान केला आहे, असे मुंडे यांनी सांगितले. थकबाकीच्या नावावर गरीबांची वीज तोडण्याचे काम सध्या सुरू असून दिवाळी होईपर्यंत कोणाचीही वीज तोडू नये, अशी मागणी मुंडे यांनी केली.
राज्यात पुन्हा वीज दरवाढीचा प्रचंड बोजा ग्राहकांच्या माथी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. ऊर्जा खात्यातील भ्रष्टाचारही समोर येत आहे. महाराष्ट्रातील वीज देशात सर्वाधिक महाग असून या दरवाढीला स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
‘पवार तिसऱ्या आघाडीत जाणार नाहीत’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिसऱ्या आघाडीत जातील, असे वाटत नाही. तिसऱ्या आघाडीचा वापर करून पवार काँग्रेसवर दबाव आणतील व लोकसभेसाठी २६-२२ चे सूत्र मान्य करून घेतील, असेही मुंडे म्हणाले.

Story img Loader