राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी दिली. आर. आर. पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आर. आर. पाटील यांच्यावर उपचार सुरू असून, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे. त्यांना सध्या कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांत त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत आहेत. त्यातच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यापूर्वीही त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Story img Loader