लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : देशात रब्बी हंगामात नोव्हेंबरअखेर ४२८ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गहू, कडधान्ये आणि श्रीअन्न लागवडीने आघाडी घेतली असून, गेल्या वर्षीपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झालेली आहे. जानेवारीअखेरपर्यंत लागवडी होणार असल्यामुळे यंदा रब्बी हंगामात विक्रमी क्षेत्रावर लागवडी होण्याचा अंदाज आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा क्षेत्र वाढले आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात रब्बी हंगामातील सरासरी लागवड क्षेत्र ६३५.६० लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षी (२०२३-२४) रब्बी हंगामात ४११.८० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा नोव्हेंबरअखेर ४२८.८४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात देशाच्या विविध भागांत जानेवारीअखेरपर्यंत पेरण्या होतात. त्यामुळे यंदा उच्चांकी क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे.
आणखी वाचा-फळपीक विमा योजनेतही बोगस अर्जांचा सुळसुळाट; जाणून घ्या, सर्वांधिक बोगस अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आले
यंदा नोव्हेंबरअखेर गव्हाची पेरणी २००.३५ लाख हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षी गव्हाची पेरणी १८७.९७ लाख हेक्टरवर झाली होती, तर सरासरी पेरणी क्षेत्र ३१२.३५ लाख हेक्टर आहे. भात लागवड ९.७५ लाख हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षी ९.१६ लाख हेक्टरवर भात लागवड झाली होती. कडधान्यांची लागवड १०८.९५ लाख हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षी १०५.१४ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. रब्बीतील कडधान्य लागवडीखालील सरासरी क्षेत्र १४०.४४ लाख हेक्टर आहे. यंदा हरभरा लागवड ७८.५२ लाख हेक्टर, मसूर १३.४५ लाख हेक्टर, वाटाणा ७.५४ लाख हेक्टर, कुळीथ २.०९ लाख हेक्टर, उडीद २.२१ लाख हेक्टर, मूग ०.२२ लाख हेक्टर, लाख (लाखोडी) २.२८ लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची २.६४ लाख हेक्टर, अशी एकूण कडधान्यांची नोव्हेंबरअखेर १०८.९५ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.
श्रीअन्न म्हणजे पौष्टिक तृणधान्यांची लागवडही वाढली आहे. सरासरीक्षेत्र ५३.८२ लाख हेक्टर आहे. गेल्यावर्षी २४.६७ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा २९.२४ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी या मुख्य तृणधान्यांची लागवड केली जाते. नोव्हेंबरअखेर ज्वारीची पेरणी १७.४३ लाख हेक्टर, बाजरीची पेरणी ०.०५ लाख हेक्टर नाचणी ०.५३ लाख हेक्टर, लहान तृणधान्ये ०.०९ लाख हेक्टर, मका ६.८७ लाख हेक्टर, बार्ली ४.२७ लाख हेक्टर, अशी एकूण तृणधान्यांची पेरणी २९.२४ लाख हेक्टरवर झाली आहे.
आणखी वाचा-मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रात संधी!
तेलबियांची लागवड ८०.५५ लाख हेक्टरवर
मोहरी हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. यंदा मोहरीची लागवड ७५.८६ लाख हेक्टर, भुईमूग १.९७ लाख हेक्टर, सूर्यफूल ०.४७ लाख हेक्टर, तीळ ०.०३ लाख हेक्टर, जवस १.८८ लाख हेक्टर आणि अन्य तेलबियांची ०.१३ लाख हेक्टर, अशी तेलबियांची एकूण लागवड ८०.५५ लाख हेक्टरवर झाली आहे. रब्बीतील तेलबिया प्रामुख्याने मध्य भारतात म्हणजे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशला लागून असलेल्या राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र (विदर्भ, मराठवाडा) आणि गुजरामध्ये होते. मोहरीची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात होते.
रब्बी हंगाम दृष्टीक्षेपात
रब्बीचे सरासरी क्षेत्र – ६३५.६० लाख हेक्टर
गेल्या वर्षी (२०२३ – २४) लागवड- ४११.८० लाख हेक्टर
यंदा नोव्हेंबरअखेर लागवड – ४२८.८४ लाख हेक्टर