महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचा भाडेपट्टा संपताच मुदतवाढ किंवा जागा काढून घेणे यापैकी कोणतीच कृती सरकारच्या पातळीवर लगेचच होण्याची शक्यता नसल्याने सध्या या जागेचा ताबा असलेली ‘रॉयल इंडिया वेस्टन टर्फ क्लब’ ही संस्था आता ‘अनधिकृत वहिवाटदार’ ठरली आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या ताब्यातील जागा परत मिळावी अशी शिवसेनेची मागणी असली तरी एकूण साडेआठ लाख चौरस मीटरमधील पालिकेच्या ताब्यातील अडीच लाख चौरस मीटर नक्की कोठे आहे, याबाबत काहीच निश्चितता नाही. तसेच सरकारच्या संमतीशिवाय महापालिका कोणतीही कारवाई करू शकणार नसल्याने रेसकोर्सच्या जागी ‘थीम पार्क’ बनवण्याचे शिवसेनेचे स्वप्न धूसर आहे.
रेसकोर्सवरील एकूण साडेआठ लाख चौरस मीटर जागेपैकी महापालिकेच्या ताब्यातील अडीच लाख चौ. मी. जागा ताब्यात मिळावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र, तशी जागा देणे शक्य नसल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गोडय़ा पाण्याची तळी उभारण्याकरिता राज्य शासनाने ही जागा महापालिकेला दिली होती. मात्र, ही जागा नेमकी कोठे आहे, याबाबत निश्चितता नाही. त्यातही ही जागा पालिकेला परत केली तरी या जागेवर उद्यान किंवा अन्य कोणतेही बांधकाम करण्यासाठी ‘मोकळय़ा जमिनी’चे आरक्षण हटवावे लागेल. ही सारी किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे जागेबाबत पुढील निर्णय होईपर्यंत टर्फ क्लब ही संस्था अनधिकृत वहिवाटदार म्हणून समजली जाईल, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शासन किंवा महानगरपालिकेने या संस्थेला कोणतेही पत्र दिलेले नाही. यापूर्वी १९९४ मध्ये भाडेपट्टा संपल्यावर मुदतवाढ २००४ मध्ये देण्यात आली होती याकडे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी लक्ष वेधले. म्हणजेच पुढील निर्णय होईपर्यंत ही जागा टर्फ क्लबच्या ताब्यात राहणार हेच सूचित होते.
मुंबईकरांना आनंद द्या – ठाकरे
भाडेपट्टा संपल्याने महालक्ष्मी रेसकोर्सची जागा टर्फ क्लबकडून काढून घ्यावी. तसेच या जागेत मोठे उद्यान उभारावे, या मागणीचा पुनरुच्चार करतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित उद्यानाचे संकल्पचित्र शुक्रवारी सादर केले. हा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात येणार असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader