मुंबईत मोकळी जागा राहिले पाहिजे या शरद पवार यांच्याच भूमिकेची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी री ओढत या जागेच्या भाडेपट्टय़ाबाबतचा राजकीय निर्णय हा सारासार विचार करूनच घेतला जाईल, असे स्पष्ट केले. रेसकोर्स हे मोठय़ा शहरांचे वैभव असून, जगातील सर्वच महानगरांमध्ये रेसकोर्स असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रेसकोर्सच्या जागेबाबत मुंबई महानगरपालिकेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यावरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेटून उद्यानाचे संकल्पचित्र सादर केले. या मोकळ्या जागेत कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ नये ही शासनाची भूमिका आहे. ही जागा मोकळीच राहिली पाहिजे. अन्यथा अन्य कोणते तरी कारण पुढे करून त्यावर बांधकाम करण्याचा काही जणांचा प्रयत्न असू शकतो, असा टोलाही त्यांनी हाणला.
रेसकोर्सच्या जागेचा निर्णय हा राजकीय असेल. आपल्याला या संदर्भात सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. यापूर्वी भाडेपट्टा संपल्यावर दहा वर्षांनंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच आताही होऊ शकते, असे त्यांनी सूचित केले.
बेटिंग अधिकृत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून रेसकोर्सला मुदतवाढ दिली जाईल, असे संकेत मिळतात.