राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा नेत्यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी असं असेल तर मग फडणवीसांच्या गळ्यात मंगळसुत्र बांधा, असा खोचक टोला लगावला. याला आता राधाकृष्ण विखेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते रविवारी (२३ एप्रिल) माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असं लोक म्हणत होते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की, त्यांनी आमच्या भाजपाचंच मंगळसुत्र घातलं होतं. आता त्यांना त्याचा विसर पडला आहे. म्हणजे लग्न करायचं, आमचं मंगळसुत्रं घालायचं आणि लग्नानंतर दुसऱ्याबरोबर घरोबा करायचा.”

“त्यांच्या वज्रमुठीला आत्ताच तडे गेले आहेत”

“तिथंही त्यांची काय अवस्था आहे. तिथं ते त्यांना नांदवायला तयार नाहीत. त्यांच्या वज्रमुठीला आत्ताच तडे गेले आहेत. निदान ते त्यांना सोडणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. एवढाच माझा त्यांना सल्ला असेल,” अशी टीका राधाकृष्ण विखेंनी केली.

“राऊतांच्या भंपक विधानाला मी उत्तर देण्याची गरज नाही”

विखे पुढे म्हणाले, “संजय राऊत यांच्या भंपक विधानाला मी उत्तर देण्याची गरज नाही. सरकारमध्ये एकनाथ शिंदेंच्या रुपात एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहे. आत्ताही आमचंच सरकार आहे आणि २०२४ मध्येही आमचंच सरकार असेल. या सरकारला विश्वनेता म्हणून जगाने गौरवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पाठबळ मिळालं आहे.”

“संजय राऊत यांचे दिवस भरत चालले आहेत”

“संजय राऊत यांचे दिवस भरत चालले आहेत. त्यांनी आता वेगळा व्यवसाय शोधला पाहिजे,” असा टोलाही विखेंनी राऊतांना लगावला.

हेही वाचा : “‘डेथ वॉरंट’ निघालं, १५ दिवसात सरकार कोसळणार”, राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरे म्हणाले…

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं मत व्यक्त केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस भाजपा नेत्यांच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावर बसवावं. त्यांना कुणी थांबवलं आहे. तुमच्या मनात वेगळा आहे आणि तुम्ही दुसऱ्याबरोबरच नांदत आहात. हा व्यभिचार आहे.”

“लग्न एकाबरोबर आणि दुसऱ्याबरोबर संसार करत आहेत. यासारखा व्यभिचार नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसुत्र बांधावं. आम्ही कुठं आडवलं आहे. आम्हालाही चालतील,” असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrishna vikhe answer sanjay raut for criticism over devendra fadnavis pbs
Show comments