नारायण राणे यांच्या पराभवामुळे विरोधी पक्षनेतेपदावरील टांगती तलवार दूर झाल्याने राधाकृष्ण विखे-पाटील हे सुखावले असतील, तर सभागृहात राणे आले नाहीत यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हायसे वाटले असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  
सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष काहीच आक्रमक भूमिका घेत नाही, अशी टीका करीत, निवडून आल्यास विरोधी पक्षनेतेपदावर आपलाच दावा राहणार हे राणे यांनी सूचित केले होते. त्यामुळे अलीकडेच विरोधी पक्षनेतेपद मिळालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती. राणे निवडून आल्यावर विखे-पाटील यांचे पद वाचणार का, अशी चर्चा काँग्रेस आमदारांमध्ये सुरू झाली होती. राणे यांच्या पराभवामुळे विखे-पाटील यांच्या डोक्यावरील टांगती तलवार परस्परच दूर झाली आहे.
विधिमंडळात तशी विरोधी बाकांवरील धार बोथटच आहे. कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य प्रश्नांवर सरकारला घेरण्याची आलेली संधी विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घालविली. राणे यांच्यासारखा आक्रमक नेता सभागृहात आला असता तर सारा प्रकाशझोतच बदलला असता. विरोधी पक्षनेतेपद भूषविताना राणे यांनी तेव्हा सरकारची झोप उडविली होती. राणे निवडून आलेले नसल्याने मुख्यमंत्र्यांना साहजिकच हायसे वाटले असणार, असे सत्ताधारी आमदारांमध्ये बोलले जात आहे.
राणे यांच्या पराभवामुळे राष्ट्रवादीच्या गोटातही उत्साहाचे वातावरण आहे. कारण काँग्रेसच्या बाकांवर फार कोणी आक्रमक नसल्याने अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आदी राष्ट्रवादीचे नेते किल्ला लढवितात. नारायण राणे सभागृहात आले असते तर राष्ट्रवादीचे महत्त्व कमी झाले असते. तसेच काँग्रेसमधील एक गटही राणे यांच्या पराभवामुळे खूश झाला असणार, अशी चर्चा आहेच.

Story img Loader