काळेगावघाट गावातील रेडिओ स्फोटात जखमी झालेले राज्य परिवहन मंडळाच्या सेवेतील वाहक ओम निंबाळकर, त्यांची पत्नी उषा आणि मुलगा कुणाल या तिघांनाही डोळे गमवावे लागले आहेत. निंबाळकर यांच्या आई कुसूम यांच्या डोळ्यांनाही इजा झाली असून त्यांचे डोळे वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी रविवारी दिली.
मुंबई येथून अंबाजोगाई गाडीत आढळलेले बेवारस पार्सल निंबाळकर यांनी घरी नेले होते. पार्सलमध्ये रेडिओ आढळला. त्यात त्यांनी सेल टाकून सुरू करण्याचा प्रयत्न करताच स्फोट झाला. स्फोटात निंबाळकर जबर जखमी झाले. पत्नी, मुलगा व आई हेही जखमी झाले. या सर्वाना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. निंबाळकरांवर नेत्रविभाग, प्लास्टिक सर्जरी व अस्थि विभागातील डॉक्टर उपचार करत आहेत. मात्र, निंबाळकरांचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. तर मुलगा कुणाललाही डोळे गमवावे लागले आहेत. निंबाळकरांची पत्नी उषा या दोन महिन्यांच्या गर्भवती असून त्यांच्या जखमी डोळ्यांतून आतापर्यंत १६ खडे काढण्यात आले आहेत. िनबाळकर यांच्या आई कुसूम यांच्या डोळ्यांनाही इजा झाली असली तरी त्यांच डोळे वाचवता येणे शक्य आहे व त्या दृष्टीने डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.
एक जणाला अटक
दरम्यान, रेडिओ स्फोटाला वैयक्तिक वादाची किनार असल्याची माहिती रविवारी पुढे आली. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख राकेश मारिया यांनी दिली. निंबाळकर यांच्या जबाबानंतर पार्सलमध्ये असलेल्या केंद्रेवाडी व त्यावरील मोबाइल नंबरवरून पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील गोपीनाथ तरकसे यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गावातील मुंजप्पा गिरीबरोबर आपला वाद असल्याचे सांगून त्यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये मुंजप्पानेच ते पार्सल ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. गावात गिरी व तरकसे यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. त्यातून अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हाही दाखल झाला होता, असे सांगितले जाते. या वादातून वैयक्तिक घातपात करण्याच्या उद्देशाने हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.    

Story img Loader