इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी काही वेळापूर्वी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत दाखल होताच राहुल गांधी यांनी ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, देशात जी-२० परिषद होत आहे. जगभरातील मोठमोठे नेते या परिषदेसाठी भारतात येत आहेत. याच वेळी जगभरातील वर्तमानपत्रं अदाणी प्रकरणावर जे काही प्रसिद्ध करत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित करत आहेत त्याने आपल्या देशाची प्रतिमा मलीन होत आहे.
यावेळी राहुल गाधी यांनी तीन आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांची कात्रणं दाखवली आणि त्यामध्ये केलेले दावे वाचून दाखवले. राहुल गांधी म्हणाले, अदाणी यांच्या कंपनीच्या माध्यमातून एक बिलियन डॉलर्स भारतातून वेगवेगळ्या देशात गेले आणि ते वेगवेगळ्या मार्गाने परत आले. त्या पैशांचा वापर करून अदाणी यांनी त्यांच्या शेअर्सच्या किंमतीत फेरफार केला. त्यातून त्यांना जो फायदा झाला, त्याच फायद्यातून ते आता देशात विमानतळं, बंदरं खरेदी करत आहेत. देशातल्या पायाभूत सुविधा ते खरेदी करत आहेत. आत्ताच इथे धारावीत त्यांना मोठा प्रकल्प मिळाला आहे.
राहुल गांधी म्हणाले, अदाणी हे त्यांच्या परदेशी भागीदारांबरोबर मिळून देशातल्या संस्था, पायाभूत सुविधा विकत घेत असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का बसले आहेत? ते याप्रकरणी काहीच का करत नाहीत? या वर्तमानपत्रांनी पंतप्रधान मोदींवर संशय व्यक्त केला आहे. अदाणींच्या कंपनीत पैसा कोणाचा आहे? तो पैसा अदाणींचा आहे की आणखी कोणाचा आहे? जर तो अदाणींचा नसेल तर मग तो नेमका कोणी गुंतवला आहे? याची उत्तरं मिळाली पाहिजेत.
आपल्या देशातल्या ज्या तपास यंत्रणा आहेत, त्या स्वस्थ का बसल्या आहेत? सीबीआय, ईडीसारख्या संस्था अदाणी प्रकरणाचा तपास का करत नाहीत? या संस्था अदाणी यांची चौकशी का करत नाहीत? असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केले.