मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची रविवारी १७ मार्चला मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभेने सांगता होणार आहे. त्यावेळी इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या सांगता सभेतच लोकसभा निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकले जाणार आहे. त्यादृष्टीने प्रदेश काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे.
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला नंदूरबार येथून महाराष्ट्रात प्रवेश करेल व १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
हेही वाचा >>> अभिनेत्री क्रांती रेडकरला ठार मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. राहुल गांधी यांचे नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी मागितली होती व ती मिळाली आहे. भारत जोडो न्याय यात्रा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भूमीत येत आहे. या महापुरुषांच्या विचारांना संपवण्याचे काम केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार करत आहे. भाजप लोकशाही व संविधान संपवायला निघाले आहे परंतु त्यांना जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.
शिवाजी पार्कवर सभेसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने परवानगी दिली आहे. राहुल गांधी यांच्या सभांना काही राज्यांमध्ये परवानगी नाकारण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कच्या सभेसाठी लवकर परवानगी मिळण्याबाबत काँग्रेस नेते साशंक होते. पण सरकारने परवानगी दिली आहे.