मुंबई : धारावी ही तुमची आहे आणि तुमचीच राहील, असे मत व्यक्त करतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लघुउद्याोगांच्या विस्तारासाठी जे काही सहकार्य करता येईल ते करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील, असे आश्वासन गुरुवारी दिले.
मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग असलेल्या धारावीला राहुल गांधी यांनी भेट दिली. येथील चर्मोद्याोग तसेच अन्य लघुद्योगांच्या समस्या जाणून घेतल्या. धारावीतील लघुउद्योग टिकून राहण्यासाठी त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हायला हवे. सरकारच्या माध्यमातून त्यांना सहाय्य मिळायला हवेच. धारावी हे भारताचे उत्पादन केंद्र व्हायला हवे, अशा शब्दांत राहुल यांनी या लघुद्योजकांना प्रोत्साहन दिले.
धारावीतील चमार स्टुडिओ, मारुती लेदर क्राफ्ट, नेटके लेदर वर्क येथेही राहुल यांनी भेट दिली. ‘चमार स्टुडिओ’ चालवणारे तरुण उद्योजक सुधीर राजभर यांची राहुल यांनी खास भेट घेतली. या वेळी राहुल यांनी स्वत: एका बॅगेला शिलाई करण्याचा प्रयत्न केला. येथील नेटके लेदर वर्कला भेट देताना त्यांनी लघुद्याोजकांच्या समस्याही जाणून घेतल्या. कौशल्य विकास केंद्रे उभारण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राहुल यांच्याकडून सुनील नेटके, भाऊसाहेब तांबे यांना देण्यात आले.
‘मुलुंडला जाणार नाही…’
अत्यंत लहान घरात पाच जणांचे कुटुंब असणाऱ्या सुरेंद्र कोरी यांच्या घरात जाऊन राहुल गांधी यांनी संवाद साधला. यावेळी आपण धारावी सोडून कुठेही जाणार नसल्याचे कोरी कुटुंबाकडून सांगण्यात आले. मुलुंडमध्येही जाणार नाही. आमच्या पिढ्यानपिढ्या इथे गेले असल्याने धारावीतच राहणार अन्यत्र स्थलांतरित होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी धारावीकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या वेळी खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.