गेल्या आठ वर्षांच्या राजकीय प्रवासात सातत्याने नापास झालेल्या राहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करून काँग्रेसने आपल्यासाठी मोठा खड्डा खणून ठेवला आहे. काँग्रेसमधील नापासांच्या शाळेतील हा नवा ‘मॉनिटर’ कोणतेही राजकीय दिवे लावू शकणार नाही, अशी टीका करीत, काँग्रेस उपाध्यक्षपदावरील राहुल गांधी यांच्या बढतीची शिवसेनेने जोरदार खिल्ली उडविली.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवरच थेट बोट ठेवले. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जेवढय़ा निवडणुका काँग्रेसने लढविल्या त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे पानिपतच झालेले दिसते. राहुल गांधी यांच्याकडे कोणती दिशा नाही, धोरण नाही आणि देशाने उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षेने पाहावे असेही काही नाही. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करून त्यांच्याकडून काँग्रेसवाल्यांनी काही आशा बाळगणे म्हणजे रेडय़ाकडून दूध काढण्यासारखे असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Story img Loader