कोल्हापूर/मुंबई : महाविकास आघाडीच्या आज, बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काँग्रेसची मतदारांना ‘गॅरंटी’ जाहीर करणार आहेत. मात्र त्याच्या आदल्याच दिवशी महायुतीने कोल्हापूरमधील सभेत दहा प्रमुख वचने दिली आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये आदी आश्वासनांचा यात समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणात दहा वचनांचे सविस्तर विवेचन केले. महिला शक्तीला प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त करताना शिंदे म्हणाले, की लाडक्या बहिणींना (पान ४ वर)(पान १ वरून) यापुढे प्रत्येक महिन्याला २१०० रुपये दिले जातील. महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांना पोलीस दलात समावेश केला जाईल. अंगणवाडी, आशा सेविकांना १५ हजार वेतन आणि संरक्षण देण्यात येईल. वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला १५०० वरुन २१०० रुपये दिले जातील. शेतकरी सन्मान योजनेतून प्रत्येक वर्षाला १५ हजार देण्यात येतील. मुख्यमंत्र्यांनी २५ लाख रोजगारनिमिर्ती आणि १० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून मासिक १० हजार रुपये विद्यावेतन देण्याचे वचनही दिले.
हेही वाचा >>>Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?
काँग्रेसच्या वचननाम्याचे आज प्रकाशन
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना दरमहा तीन हजार रुपये अनुदान व एस.टी.मध्ये मोफत प्रवास, सरकारी सेवेत नोकरभरती, आरोग्य विम्याचे कवच अशा विविध आश्वासनांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या वचननाम्याचे बुधवारी राहुल गांधी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या वतीने कर्नाटक आणि तेलंगणात यशस्वी ठरलेला ‘गॅरंटी’चा प्रयोग राज्यातही राबविण्यात येणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसच्या वतीने सहा आश्वासने देण्यात आली होती.