लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील एकूणच तयारीचा गुरुवारी आढावा घेतला. संघटनात्मक सर्व समित्या स्थापन करण्याचा आदेश देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील आघाडी आणि जागावाटप यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सर्व राज्यांच्या नेत्यांबरोबर निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करून राहुल गांधी सध्या आढावा घेत आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी राहुल गांधी यांनी चर्चा केली. प्रदेश काँग्रेसची संघटनात्मक परिस्थिती राहुल यांनी जाणून घेतली. संघटनात्मक रिक्त पदे त्वरित भरण्याचा आदेश त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील आघाडी हा चर्चेतील विषय होता. आघाडी कायम ठेवताना गेल्या वेळी लढलेल्या २२ जागांची तयारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केली आहे. पवार यांच्या एकूणच भूमिकेबद्दल मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी मते मांडल्याचे समजते.
राष्ट्रवादीच्या ताब्यातील काही मतदारसंघ मिळावेत, अशी काँग्रेसची भूमिका आहे. राज्यात गेल्या वेळी काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. यंदाही महाराष्ट्रातून चांगले यश मिळावे, अशी राहुल गांधी यांची अपेक्षा आहे. त्यानुसार सध्याची राजकीय परिस्थिती आणि कोणते उपाय योजावे लागतील यावर चर्चा करण्यात आली. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. काँग्रेसच्या दृष्टीने मुंबई महत्त्वाची आहे. गेल्या वेळी मुंबईतील पाचही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. हाच कल कायम ठेवावा, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली. मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष चांदूरकर यांनी मुंबईतील राजकीय परिस्थितीची माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा