काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’च्या बैठकीला आले असताना केंद्रातील मोदी सरकारवर आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्याबाबत गंभीर आरोप केले. यावेळी राहुल गांधींनी चीनच्या च्यांग चुंग लिंग या व्यक्तिचा उल्लेखही केला. तसेच हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा असल्याचं म्हणत भारतीय शेअर बाजार प्रभावित करण्यात चीनच्या नागरिकाचा नेमका काय सहभाग? असा प्रश्न विचारला. ते गुरुवारी (३१ ऑगस्ट) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, “अदाणींच्या कंपनीत गुंतवणूक करून कंपनीच्या शेअरचे भाव वाढवणे आणि त्याआधारे देशाच्या पायाभूत सुविधा खरेदी करण्यामागील मास्टरमाईंड विनोद अदाणी आहेत. ते गौतम अदाणींचे भाऊ आहेत. विनोद अदाणींबरोबर आणखी दोन व्यावसायिक भागिदार आहेत. एकाचं नाव नासिर अली शबान अली आणि दुसरा च्यांग चुंग लिंग हा आहे. च्यांग चुंग लिंग चीनचा आहे.”
“परदेशी नागरिक भारताच्या शेअर बाजाराला प्रभावित कसे करतात?”
“त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, अदाणी भारताच्या पायाभूत सुविधा खरेदी करत असताना चीनच्या च्यांग चुंग लिंगचा यात समावेश कसा? यात त्याची भूमिका काय? त्याने काय केलं हे स्पष्ट झालं पाहिजे. परदेशी नागरिक भारताच्या शेअर बाजाराला प्रभावित कसे करत आहेत? हा प्रश्न का विचारला जात नाही?” असा सवाल राहुल गांधींनी विचारला.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : अदाणींच्या शेअर्सबाबत OCCRP च्या अहवालात मोठा गौप्यस्फोट, ‘ओपेक फंड’चा वापर करून…
“हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न”
“हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. अदाणी संरक्षण विभागातही काम करतात. ते पायाभूत सुविधा क्षेत्रातही काम करतात, विमानतळे आणि बंदरे यात काम करतात. अशावेळी चीनचा नागरिक असलेल्या च्यांग चुंग लिंग याची भूमिका काय आहे?”, असाही प्रश्न राहुल गांधींनी विचारला.