लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुढील आठवडय़ात दोन दिवस मुंबई आणि पुण्यात राज्यातील पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्याच्या मुद्दय़ावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. गेल्या महिन्यात मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांचा आढावा त्यांनी घेतला होता. आता राज्यातील बाकीच्या जिल्ह्य़ातील नेत्यांशी ते संवाद साधणार आहेत. सोमवारी मुंबईत विदर्भ आणि अन्य भागातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील नेत्यांची बैठक पुण्यात होईल. गेल्या निवडणुकीत राज्यातून काँग्रेसचे १७ खासदार निवडून आले होते. हेच संख्याबळ कायम राखण्याचे आव्हान असले तरी हे संख्याबळ जास्त घटू नये यावर काँग्रेसचा भर आहे. प्रत्येक जिल्ह्य़ातील राजकीय परिस्थितीचा राहुल गांधी आढावा घेत असून त्यातून संघटनात्मक परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.

Story img Loader