गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला साथ देणाऱ्या मुंबईतील पक्षसंघटनेचा आढावा घेण्याकरिता काँग्रेसचे नवनियुक्त उपाध्यक्ष राहुल गांधी हे शुक्रवारी मुंबईत येत आहेत. मुंबईत पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न असला तरी गेले वर्षभर अध्यक्षपदी कोणाला नेमायचे याचा निर्णय पक्ष घेऊ शकलेला नाही.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईतील सहापैकी लोकसभेच्या पाच जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. विधानसभेतही मुंबईत काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले. या पाश्र्वभूमीवर काँग्रेससाठी मुंबई महत्त्वाची आहे. राज्यातून गेल्या वेळी काँग्रेसचे १७ खासदार निवडून आले होते. हे संख्याबळ कायम राखणे कठीण असल्याचा अंदाज काँग्रेस नेत्यांना आला आहे. यामुळेच मुंबईतील आपले वर्चस्व कायम राखण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. उद्याची भेट ही फक्त मुंबई काँग्रेसच्या कामाचा आढावा घेण्यासाठी असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. पक्षाच्या टिळक भवन येथील मुख्यालयात राहुल गांधी हे शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.
गेल्या वर्षी महापालिका निवडणुकीत झालेला पराभव तसेच न्यायालयाने ताशेरे ओढल्याने कृपाशंकर सिंग यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाला नेमायचे यावरून एकमत झालेले नाही. राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड होईल अशी अपेक्षा आहे.