मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज (१७ मार्च) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील जाहीर सभेने समारोप होणार आहे. या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल. मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा दोन महिन्यानंतर सुमारे ६,७०० किलोमीटरचा प्रवास करून दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या स्मारकस्थळी शनिवारी दाखल झाली. राहुल यांचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी धारावीत झालेल्या सभेला प्रियंका गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आदी उपस्थित होते. राहुल यांची रविवारी मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी पदयात्रा पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाईल. या सभेसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधी हे शनिवारी सायंकाळी दादरमध्ये दाखल झाले. दादरमध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी शिवसेना भवनाला भेट दिली. तिथून ते चैत्यभूमीकडे रवाना झाले. यावेळी शिवसैनिकांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचं जगी स्वागत केलं. दरम्यान, राहुल गांधींच्या स्वागताला वीर विनायक सावरकर यांचं राष्ट्रभक्तीगीत ‘जयोस्तुते, जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे’ हे गाणं (गाण्याची धुन) बँडवर वाजवण्यात आलं. सावरकर हे भारतीय जनता पार्टीसह इतर हिंदुत्ववादी संघटनांसाठी आदर्श आहेत. याच सावरकरांवर राहुल गांधी यांनी अनेकवेळा टीका केली आहे. अशातच राहुल यांच्या स्वागताला शिवसैनिकांनी सावरकरांचं राष्ट्रभक्तीगीत वाजवल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
हे ही वाचा >> “पंतप्रधानांवर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करा”, निवडणूक रोख्यांच्या ‘त्या’ माहितीवर बोट ठेवत राऊतांची मागणी
दरम्यान, यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भातखळकर म्हणाले, राहुल गांधी यांना जन गण मन’ हे भारताचं राष्ट्रगीतही येत नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेत वाट्टेल ते चालू असतं. राहुल गांधी यांचं सुदैव आहे की त्यांच्या स्वागताला सावरकरांचं जयोस्तुते हे गाण वाजवण्यात आलं. राहुल गांधींना सावरकर कळणं, त्या गीताचा अर्थ कळणं अवघड आहे. तो अर्थ जाणून घेणं राहुल गांधींच्या बौद्धिक क्षमतेपलिकडे आहे.