भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे मात्र अजूनही बंद खोलीतील संवादसत्रच सुरू आहे. मोदी यांच्याप्रमाणे राहुल हे लोकांमध्ये थेट मिसळत का नाहीत, या शंकेने काँग्रेसजनांतच अस्वस्थतेची भावना पसरली
आहे.
राहुल गांधी उद्यापासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या नागपूरमध्ये विदर्भ आणि मराठवाडय़ातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी जिल्हानिहाय संवाद साधणार आहेत. यापूर्वी मुंबईत त्यांनी अशाच प्रकारे संवाद साधला होता. बंद खोलीत राहुल गांधी हे एकटेच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतात. अगदी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा राज्याच्या प्रभारींना शेजारच्या दालनात युवराजांसाठी थांबावे लागते, असे सांगण्यात
आले.
दुसरीकडे, मोदी यांनी देशाच्या विविध भागांमध्ये दौरे करून सभांचा सपाटा लावला आहे. राहुल गांधी मात्र अजूनही बंद खोलीत बैठका, स्वयंसेवी संस्थांप्रमाणे काम करण्यातच धन्यता मानतात, अशी काँग्रेस नेत्यांचीच ओरड आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे.
सोनिया गांधी या अन्य नेत्यांनी सल्ला दिल्यास त्याप्रमाणे निर्णय घेतात, पण राहुल गांधी मात्र, असे सल्ले मानत नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात बोलले जाते.
पुण्यात सारे ‘कलमाडी’मय
विदर्भातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळूवन द्यावी, यावर स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भर राहणार आहे. पुण्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांतील पदाधिकाऱ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याची व्यवस्था राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यात तुरुंगाची हवा खाऊन आलेले व पक्षाने निलंबित केलेले खासदार सुरेश कलमाडी यांच्या समर्थकांकडे सोपविण्यात आल्याने काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कलमाडी यांनी आयोजित केलेल्या पुणे फेस्टिवलला अलीकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिल्याबद्दल काँग्रेसमध्ये तोही चर्चेचा विषय ठरला होता.