काँग्रेस नेते राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधींच्या विधानानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पत्रकारपरिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांविषयी लिहिलेल्या एका पत्राचा दाखला देत शेलारांनी राहुल गांधीवर निशाणा साधला.
आशिष शेलार म्हणाले, “ राहुल गांधीचं विधान हे खरा इतिहास लपवणारं आहे. जर अर्ध वाचलेलं पत्र राहुल गांधी देशासमोर दाखवणार असतील, तर काँग्रेस नेतृत्वाला आणि राहुल गांधींना हेही इंदिरा गांधी यांचं पत्र वाचावं लागेल. हे पत्र स्वत: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लिहिलेलं पत्र आहे. इंदिरा गांधी असं लिहितात, भारताचे सुपुत्र हे सावरकर आहेत. त्यांचा उल्लेख वीर सावरकर म्हणून त्या करतात. ज्या वीर या शब्दावर स्वत: राहुल गांधी भाषणामध्ये ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्यांच्या आजीचं पत्रही वाचलेलं नाही. पुढे इंदिरा गांधी म्हणतात, सावरकरांचं युद्ध अतिशय धाडसी होतं. ब्रिटिश सरकारच्या विरोधातील युद्धात त्याची नोंद इतिहासात होईल, असं कार्य सावरकरांनी केलं आहे.”
हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये भर कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ
याचबरोबर “राहुल गांधी यांनी नेहरुंना वाचलेलं नाही, इंदिरा गांधींचा अभ्यास केलेला नाही. आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं, एवढ्या पुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय. म्हणून त्यांचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे. राहुल गांधींचं विधान हा बेअक्कलपणा आहे म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो.” असंही यावेळी शेलार यांनी म्हणत राहुल गांधींवर टीका केली.
याशिवाय, “हे इंदिरा गांधींचं पत्र मी तुम्हाल देतो, सावरकरांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या कार्यक्रमात इंदिरा गांधी याव्यात या अपेक्षने लिहिलेलं हे पत्र आहे. त्याला उत्तर देताना इंदिरा गांधींनी संपूर्ण शब्द विचार करून लिहिले आहेत, असं आमचं मत आहे.” असंही शेलारांनी माध्यमांशी बोलताना शेवटी सांगितलं.