शिवसेनेचे टीकास्त्र
गेल्या आठ वर्षांच्या राजकीय प्रवासात सातत्याने नापास झालेल्या राहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करून काँग्रेसने आपल्यासाठी मोठा खड्डा खणून ठेवला आहे. काँग्रेसमधील नापासांच्या शाळेतील हा नवा ‘मॉनिटर’ कोणतेही राजकीय दिवे लावू शकणार नाही, अशी टीका करीत, काँग्रेस उपाध्यक्षपदावरील राहुल गांधी यांच्या बढतीची शिवसेनेने जोरदार खिल्ली उडविली.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवरच थेट बोट ठेवले. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जेवढय़ा निवडणुका काँग्रेसने लढविल्या त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे पानिपतच झालेले दिसते. राहुल गांधी यांच्याकडे कोणती दिशा नाही, धोरण नाही आणि देशाने उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षेने पाहावे असेही काही नाही. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करून त्यांच्याकडून काँग्रेसवाल्यांनी काही आशा बाळगणे म्हणजे रेडय़ाकडून दूध काढण्यासारखे असल्याचे संजय राऊत म्हणाले.
खरे म्हणजे, गेली दहा वर्षे राहुल हेच काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेतच, मग आता त्यांची उपाध्यक्षपदी निवड करून काँग्रेस निवडणुकीच्या राजकारणात कोणती बाजी मारणार आहे, असा सवालही खा. राऊत यांनी केला. काँग्रेसचे मालक तेच असताना हे निवडीचे राजकारण करण्याची गरज नव्हती. राहुल गांधी यांच्याकडून युवकांना अपेक्षा असल्याचे म्हटले जाते. मुळात ४२ वर्षांच्या राहुल गांधींना युवक म्हणायचे असेल तर ‘युवकां’ची व्याख्याच बदलावी लागेल असेही राऊत म्हणाले. छापील भाषण वाचण्याची त्यांची परंपरा असून ते देशाला तर सोडाच परंतु काँग्रेसलाही कोणतही दिशा देऊ शकणार नाही. महागाईला काँग्रेस जबाबदार, सर्वाधिक भ्रष्टमंत्री काँग्रेसच्या मंत्रिमंडळात, निधर्मवादाच्या नावाखाली जातीपातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले ते काँग्रेसनेच, अशा काँग्रेसकडून लोकांना आता कोणत्याच आशा उरलेल्या नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेतून हद्दपार होणार असून  हे एक काम राहुल यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे होईल, असेही ते म्हणाले.

Story img Loader