युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शनिवारी ( १ जुलै ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून राहुल कनाल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर शनिवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना राहुल कनाल यांनी सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख केला आहे.
“सुशांत सिंह राजपूत किंवा दिशा सालियान प्रकरणामुळे शिवसेनेत प्रवेश केला, असं लोकांचं मत आहे. पण, याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत,” अशी मागणी राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे.
हेही वाचा : “…मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘शरदवासी’ म्हणायचं का?” ‘त्या’ विधानावरून भाजपाचा पवारांवर हल्लाबोल
राहुल कनाल म्हणाले, “मी आपल्याबरोबर यायचा निर्णय घेतला तेव्हा दोन-तीन दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा करायला सुरुवात केली. सोशल मीडियात वेगवेगळ्या पोस्ट शेअर करण्यात आल्या. कुणी म्हटलं की, आपल्याला पक्षाने भरपूर काही दिलं. हो दिलं, शंभर टक्के दिलं. पण, त्याच्या हजार टक्के मी नाही दिलं, तर तुम्ही सार्वजनिकरित्या येऊन बोलून दाखवा.”
“आम्ही जनआशीर्वाद यात्रा असो किंवा पक्षाचं अन्य कोणतेही काम असेल, तुमच्यासारख्या नेत्यांना प्रेरित करतो. करोना काळात आपण मोठ्या स्वरूपात काम केलं. तसेच, आम्ही छोट्या पातळीवर काम केलं. करोना काळात आम्ही फक्त सेवा आणि सेवाच केली आहे. मेव्याशी माझा कोणताही संबंध नाही,” असेही राहुल कनाल यांनी सांगितलं.
“लोकांचं म्हणणं आहे, कदाचित सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणामुळे तिथे गेला असेल. मात्र, हात जोडून विनंती करतो, की हा आरोप सातत्याने माझ्यावर लावण्यात आला. याप्रकरणाची चौकशी करावी. मग तुम्ही म्हणाला तिथे मी जातो,” असे राहुल कनाल यांनी म्हटलं.
हेही वाचा : “मला ‘पप्पू’ म्हणता ना, तुम्हाला…”, आदित्य ठाकरेंचं शिंदे गट आणि भाजपाला थेट आव्हान
“बात घमंड की नही, इज्जत की है. लोगोने अपने लहजे बदल दिए, हमने अपने रास्ते बदल दिए,” अशी शेरोशायरीही राहुल कनाल यांनी केली आहे.