भाजपाचे आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, राऊतांच्या या आरोपांवर आमदार राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली असून हे सर्व आरोप राजकीय असल्याचं ते म्हणाले. विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले राहुल कुल?
संजय राऊतांनी नैराश्येतून हे आरोप केले आहेत. त्यांना वस्तुस्थितीची माहिती नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी आरोप केले. मी २० ते २२ वर्षांपासून कारखान्याचा अध्यक्ष आहे. हा कारखाना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो आहे. राऊत राऊतांनी केलेले आरोप हे पूर्णत: राजकीय असून राजकारणात अशा प्रकारे आरोप होणं स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया राहुल कुल यांनी दिली. पुढे बोलताना, हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी असल्यानेच राऊतांनी हे आरोप केले का? असं विचारलं असता, मी २० ते २२ वर्षांपासून या कारखान्याशी संबंधित आहे, त्यामुळे हे आरोप नेमके आताच का झाले, हे समजून घेणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी, शिंदे गटात जाणार? म्हणाले…
राऊतांकडून राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप
दरम्यान, आज संजय राऊत यांनी दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. दौड तालुक्यातील ‘भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रापयांचे मनी लॉडरिंगचे आहे. कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या सारख कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत असून त्यावर तपास यंत्रणांचे छापे पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटीच गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे. या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे, असं राऊत पत्रात म्हटलं आहे.
दोन हजार पानाचे पुरावे फडणवीसांना देणार
भीमा साखर कारखान्यातील घोटाळ्याचे दोन हजार पानाचे पुरावे आज देवेंद्र फडणवीस यांना देणार असून भविष्यात अशी १७ ते १८ साखर कारखान्याची प्रकरणं मी देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.