शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी आयएनएक्स इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल मुखर्जी याची गुरुवारी सकाळी पुन्हा चौकशी केली. या हत्येप्रकरणी दुसऱयांदा राहुल मुखर्जी याला चौकशीसाठी खार पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळी सुद्धा पोलीसांनी राहुल मुखर्जी याची चौकशी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शीना बोरा आणि राहुल मुखर्जी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. या स्थितीत शीना बोरा बेपत्ता झाल्यानंतर राहुल मुखर्जीने पोलीसांकडे त्याबद्दल तक्रार का दाखल केली नाही, असा प्रश्न पोलीसांना पडला आहे. याचाच उलगडा करण्यासाठी खार पोलीसांनी दोन वेळा राहुल मुखर्जी याला चौकशीसाठी बोलावले होते. राहुल हा पीटर मुखर्जी यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी हिने पूर्वाश्रमीचा पती व ड्रायव्हर यांच्या साह्य़ाने स्वतःच्याच मुलीची शीना बोराची हत्या केली, अशी कुबली तिने पोलीसांना दिली आहे.
हत्या कशी झाली..
२३ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने शीनाचे वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाजवळून अपहरण केले. त्यावेळी गाडीत माजी पती संजीव खन्ना व गाडीचालक श्याम राय होते. गाडीतच गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह रायगडजवळील गागोदे गावाजवळील जंगलात फेकून दिला. मृतदेह फेकण्यापूर्वी त्याची ओळख पटू नये यासाठी पेट्रोल ओतून तो जाळून टाकला होता. दरम्यान, गावकऱ्यांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पेण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह हस्तगत केला. तो अर्धवट जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्याची ‘अज्ञात’ अशी नोंद करून विल्हेवाट लावली, पण डीएनए नमुने घेऊन ठेवले नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा