शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दीर्घ सुनावणी घेत अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आणि त्यांनी उचित वेळ घेऊन यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटिस बजावली. मात्र, अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी नार्वेकरांना नोटिसची वेळ संपली असून कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (२३ ऑगस्ट) मुंबईत बोलत होते.
राहुल नार्वेकर म्हणाले, “आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्यावेळी ते ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून काम करत असतात याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर व नियमानुसार कारवाई केली जाईल.”
“कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही”
आमदारांना सुनावणीसाठी कधी बोलावलं जाईल यावर राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली. “लवकरच सुनावणी चालू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहेत. मी आश्वासित करतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. तसेच नियमांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली.
“चांद्रयान ३ मोहिमेसाठी देशवासीयांना शुभेच्छा”
“सर्व भारतवासीयांना अभिमान वाटेल अशी ही चांद्रयान ३ मोहिम भारताने हाती घेतलं आहे. काही तासातच चांद्रयानची अंतिम कार्यवाही होईल. सगळेच आतुरतेने या यशाची वाट पाहत आहेत. मी देशवासीयांना यानिमित्त शुभेच्छा देतो. ही मोहिम यशस्वीपणे पार पाडून भारताला आणखी एक विक्रम करण्याची संधी प्राप्त होवो,” अशी भावना नार्वेकरांनी व्यक्त केली.