मुंबई: मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नऊ सदस्यांच्या अपात्रतेची मागणी करणारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची याचिका रविवारी मध्यरात्री मिळाली असून त्याबाबत वैधानिक बाबी तपासून निर्णय घेणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी रविवारी शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नऊ सदस्यांनी पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचे पत्रही पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनीच पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. याबाबत भूमिका स्पष्ट करताना, नियमानुसार सर्व बाबी तपासून याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तारूढ की विरोधी पक्षात काम करीत आहे हे आधी तपासावे लागेल. तसेच कोणत्या पक्षाकडे संख्याबळ किती आहे याची कायदेशीर खातरजमा केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही गटांकडून आलेल्या अर्जाचा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.