शिंदे गटातील नेते तथा खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांचे नाव असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी राहुल शेवाळेंविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने साकिनाका पोलीस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दाखल केलेली आहे. या महिलेला मुंबईत येण्यासाठी संरक्षण द्यावे, अशी मागणी ठाकरे गटातील नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. या मागणीनंतर शेवाळे यांनी आज (२५ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच माझे राजकीय आयुष्य नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यामागे युवासेनाप्रमुख आहेत, असा गंभीर आरोप शेवाळे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> तक्रारदार महिलेकडून ब्लॅकमेलिंग, खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा दावा

“मी जेव्हा शिवसेना सोडून गेलो, तेव्हाच हे प्रकरण उचलण्यात आले. मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा माझ्याविरोधात लोकांमध्ये खोटी माहिती पसरवली गेली. काल मी लोकसभेत लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना युवासेनाप्रमुखांच्या संदर्भात काही माहिती मागितली होती. त्यानंतर पुन्हा हे प्रकरण उकरून काढण्यात आले. ही महिला आपल्या देशात ख्रिश्चन असल्याचे सांगते तर दुबईमध्ये मुस्लीम असल्याचे सांगते. या महिलेची पाकिस्तानी लोकांसोबत एक गँग आहे. या महिलेला ट्विटरवर युवासेनेचे पदाधिकारी फॉलो करतात,” असा दावा राहुल शेवाळे यांनी केला.

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचं बीज मीच पेरलं”; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “मविआ स्थापन झाल्यानंतर…”

“ज्या महिलेला मुंबई पोलीस, गोवंडी, साकिनाका पोलीस शोधत आहेत, त्या महिलेला राष्ट्रवादीच्या एक प्रवक्त्या टीव्हीवर घेऊन आल्या होत्या. ही गंभीर बाब आहे. या सर्व गोष्टी युवासेनाप्रमुखांमुळेच घडलेल्या आहेत. माझ्याकडे या महिलेच्या ट्विटर, इन्स्टाग्राम आणि कॉल्सची सर्व माहिती आहे. मागील एक वर्षापासून या प्रकरणाच्या मागे कोण आहे याची मी माहिती घेत होतो. युवासेनाप्रमुखच या सर्व प्रकरणाच्या मागे आहेत,” असा गंभीर आरोपही शेवाळे यांनी केला.

हेही वाचा >>> दिशा सालियनच्या वडिलांना माध्यमांशी बोलू न दिल्याचा आरोप, संजय राऊत म्हणाले, “सुपारीबाज लोक…”

“जेव्हा-जेव्हा मी शिवसेनेविरोधात बोलतो तेव्हा-तेव्हा हे प्रकरण काढण्यात येते. हा कटकारस्थानाचा भाग आहे. मला जेव्हा दुबईवरून धमक्या येत होत्या तेव्हा वांद्रे पोलीस ठाण्यात जसा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचप्रमाणे राजस्थान आणि दिल्लीमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या या महिलेची बाजू मांडत आहेत. त्यांनी या महिलेला मुंबई पोलिसांसमोर घेऊन यावे तेव्हाच काय खरं आणि काय खोटं हे आपल्याला समजेल. माझे राजकीय आयुष्य संपवण्याचा दृष्टीकोनातून हे कटकारस्थान रचण्यात येत आहे,” असेही राहुल शेवाळे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul shewale denies rape allegations said aditya thackeray try end political career prd