शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानाचे काम आपल्याला स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनीच बोलावून दिले, असे ‘निसर्ग नर्सरी’चे मालक सुधीर म्हात्रे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन सांगितले. त्याचप्रमाणे आपण सादर केलेल्या बिलामध्ये व्हॅट व विक्रीक्रर नोंदणी क्रमांक देण्याचे अनवधानाने राहून गेले, असा खुलासाही त्यांनी केला. नर्सरीच्या मालकांनीच ‘लोकसत्ता’समोर वस्तुस्थिती स्पष्ट केल्यामुळे, या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा दावा खोटा पडला आहे.
बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानातील रोपखरेदीतील घोटाळय़ाचे वृत्त ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे शेवाळे यांनी म्हटले असले तरी सुधीर म्हात्रे यांच्याच म्हणण्यानुसार या कंत्राटासाठी शेवाळे यांनीच त्यांच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे, तर आपण अनेकदा झाडे बदलली, तेथील कारंजे नव्याने बनविले, असेही म्हात्रे यांनी सांगितले. एलईडी तसेच अन्य केलेल्या कामाचे बिल जास्त झालेले असतानाही गेले चार महिने पैसे मिळण्यासाठी अनेकदा चकरा माराव्या लागल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय पालिकेच्या उद्यान खात्याने २८ जानेवारी २०१४ रोजी अतिरिक्त आयुक्तांना सादर केलेल्या लेखी प्रस्तावात महापौर सुनील प्रभू व स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या आदेशानुसार उद्यानाचे काम ‘निसर्ग नर्सरी’ यांनाच देण्यात येत असल्याचे म्हटले आहे, तर सदर नर्सरीला कामाचे पैसे द्यावे अशी लेखी
मागणी शेवाळे यांनीच अतिरिक्त आयुक्त अडतानी यांच्याकडे
केली आहे.
आजच तक्रार करा!
‘बाळासाहेबांच्या स्मतिस्थळ उभारणीतही लाखोंचा घोटाळा’ ही बातमी मनसेने दिलेली ‘पेड न्यूज’ असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी बुधवारी केला. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. बिलाच्या मंजुरीशी स्थायी समितीचा काहीही संबंध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात, बिल लवकर मंजूर करण्यासाठी शेवाळे यांनी पाठवलेल्या पत्राचे छायाचित्रही ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे ही ओरड म्हणजे भ्रष्टाचार दाबण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. या प्रकरणी ते उद्या निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असतील, तर ती उद्या नव्हे, आजच करावी, अशी ‘लोकसत्ता’ची स्पष्ट भूमिका आहे.
स्थायी समिती हातातून गेली आणि लोकसभेतही पराभव होणार हे स्पष्ट दिसत असल्यामुळेच वैफल्यग्रस्त शेवाळे हे मनसेवर बेताल आरोप करत आहेत.
संदीप देशपांडे, मनसे गटनेते