लाथाळ्यांमध्येच रमलेल्या विरोधकांना सत्ताधाऱ्यांमधील असंतोषाचा फायदा उठविण्यात अपयश आल्याने शिवसेना-भाजपने स्थायी व शिक्षण समितीवर भगवा फडकविला. अपेक्षेप्रमाणेच स्थायी समितीवर शिवसेनेचे राहुल शेवाळे व शिक्षण समितीवर भाजपचे मनोज कोटक अध्यक्षपदी निवडून आले.
स्थायी समितीचे अध्यक्षपद तीन वेळा भूषविणाऱ्या राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेतील नगरसेवक-नगरसेविकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. तसेच सुधार समितीच्या अध्यक्षपदावरून भाजपमध्येही धुसफूस होती. याचा फायदा उठविण्याची संधी विरोधकांना चालून आली होती. परंतु विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आणि सत्ताधारी सदस्यांना आपल्याकडे वळविण्याची क्षमता नसल्यामुळे शिवसेना-भाजपने बाजी मारली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल शेवाळे यांना १५ मते मिळाली. तर  काँग्रेसच्या ज्योत्स्ना दिघे यांना केवळ ८ मते मिळाली. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी  मनोज कोटक १५ मते मिळवून विजयी झाले, तर काँग्रेसचे शिवानंद शेट्टी यांच्या पारडय़ात केवळ ५ मते पडली. या दोन्ही निवडणुकीवर मनसेने बहिष्कार टाकला होता, तर समाजवादी पार्टी तटस्थ राहिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे या निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यात आला नाही.

Story img Loader