मुंबई : मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज यांनी मनसैनिकांना दिला आणि आक्रमक हिंदूत्वाचा पुरस्कार केला.
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. तासाभराच्या जोशपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेला पािठबा देत एकीकडे उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील कारभाराचे कौतुक केले, तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभारावर सडकून टीका केली.
राजकारण्यांमुळे झोपडपट्टय़ा वाढल्या. ‘मातोश्री’ बंगल्याच्या बाहेर पडल्यावर जवळच बेहरामपाडा या परिसरात हजारो झोपडय़ा उभ्या राहिल्या. यातील काही झोपडय़ा तर चार-चार मजल्यांच्या आहेत. बेहरामपाडा किंवा अन्य झोपडपट्टय़ांमधील परिस्थिती काय आहे, याचा कोणी विचार करीत नाही. झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये काय चालते, हे पोलिसांकडून ऐकल्यावर धोका लक्षात येतो. सरकारच्या धोरणांमुळे पोलिसांचे हात बांधलेले आहेत. पण धोका टाळण्यासाठी झोपडपट्टय़ांमधील मदरशांवर धाडी घालाव्यात, अशी विनंती आपण पंतप्रधानांना करीत आहोत, असे राज म्हणाले.
मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी करीत युरोप किंवा अन्य कोणत्या राष्ट्रात असे भोंगे आहेत का, असा सवाल राज यांनी केला. पहाटे ५ वाजल्यापासून देण्यात येणाऱ्या बांगेमुळे सामान्य जनतेला त्रास होतो. हे भोंगे सरकारने उतरविले नाहीत तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात ध्वनीक्षेपक लावण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली. मी धर्माध नाही, पण धर्माभिमानी आहे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. तसेच लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मेव्हणाच्या कंपनीवर ‘ईडी’ने जप्ती आणल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लक्ष्य करीत प्रसंगी मला अटक करा, पण नातेवाईकांना त्रास देऊ नका, असे भावनिक आवाहन केले होते. त्यावर राज यांनी टीका केली. ‘‘असे आवाहन करण्याऐवजी मुंबई महापालिकेत लक्ष घालू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांना द्यायला हवा’’, असा टोला राज यांनी लगावला. मुंबई महापालिकेतून केवळ पैसे ओरबडण्यात आले. यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी पैसे मोजण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवस लागले. यावरून किती पैसे लुबाडण्यात आले हे स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.
केवळ मुख्यमंत्रीपदासाठीच उद्धव ठाकरे यांनी मतदारांशी आणि भाजपशी गद्दारी केल्याचा आरोप राज यांनी केला. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. ते मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे घ्यायचे, असे ठरल्याचे सांगू लागले. पंतप्रधान मोदी यांच्या सभेत मात्र अशी भूमिका उद्धव यांनी कधी मांडली नव्हती. अमित शहांबरोबर एकातांत चर्चा झाल्याचा दावा करतात, पण शहा यांनी त्याचा इन्कार केला आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी जे काही केले त्याचे परिणाम आता भोगा. तुम्ही जसे राजकारण केले तसेच समोरचे राजकारण करणार, असे सांगत भाजपच्या भूमिकेचे राज यांनी समर्थन केले.
शरद पवार यांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज यांनी केला. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले तरी त्यांना मंत्री करण्यात आले. दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरून दुसरे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली. कसले हे राष्ट्रवादीचे राजकारण, असा सवालही राज यांनी केला. आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवित आमदारांनी मागणी केली नसताना घरे देण्यामागे पैसे काढण्याचा हेतू आहे का, असा सवालही राज यांनी केला. खासदार-आमदारांना देण्यात येणारे निवृत्त वेतनही बंद करण्याची मागणी ठाकरे यांनी केली.
जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत असून त्यातून त्याला बाहेर काढण्याची वेळ आली आहे. अन्य राज्ये प्रगती करत असताना महाराष्ट्र मात्र जातीच्या राजकारणात खितपत पडला आहे.
– राज ठाकरे, मनसे अध्यक्ष