मुंबईः ऑनलाईन फसवणूक करणारे सेवा केंद्र उद्ध्वस्त करण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांताक्रूझमधील जुहू तारा रोडजवळील मांगेलवाडी येथे वास्तव्यास असलेले प्रवीण साळुंखे यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. त्याने बजाझीन हॉलिडे ट्रॅव्हल्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. ऑनलाईन कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्याने प्रक्रिया शुल्कापोटी साळुंखे यांच्याकडून दोन लाख ६० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले. पण साळुंखे यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी १५ जानेवारी रोजी पोलिसाकडे धाव घेऊन तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार सांताक्रूझ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपासात तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी पवई प्लाझा, जे. व्ही. एल. आर. रोड, पवई, मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी तेथे छापा टाकून सात जणांना अटक केली. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. दीपक मनोज सिंह, समुीत विनय मिश्रा, राहुल अवधेश सिंह, सुवर्णा अमोल चव्हाण, मिसबा कलीम शेख, आम्रपाली नवनाथ काटे व मानसी आकाश लाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपींकडून १५ मोबाइल, ४ लॅपटॉप, ४९ पाकिट एअरटेल कंपनी सिमकार्ड, व्होडाफोन कंपनीचे वापरलेले ८ सिमकार्ड, १ प्रिंटर असा एकूण चार लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.