मुंबई : घरपोच सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून मुंबई, ठाण्यामध्ये ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या तीन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी छापा घातला. या छाप्यादरम्यान औषध विक्रीचा परवाना नसतानाही सदर कंपन्या ऑनलाईन औषध विक्री करीत असल्याचे आढळले. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांवर कारवाई करून १६ हजार ७०० रुपयांची औषधे जप्त करण्यात आली. तसेच ७ औषधांचे नमुने चाचणीसाठी घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

घरपोच सेवा पुरविण्याऱ्या कंपनीच्या माध्यमातून मुंबईतील कांदिवली, मालाड आणि ठाण्यामध्ये विनापरवाना ऑनलाईन औषध विक्री करण्यात येत असल्याची माहिती २० जानेवारी रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने मुंबई व ठाण्यामध्ये कारवाई केली. त्यानुसार ठाण्यातील मे. फोक्लो टेक्नोलॉजीस प्रा. लि. आणि मुंबईतील कांदिवली येथील मे. भगवती स्टोर्स प्रा. लि. व मालाड येथील मे. स्कुटसी लॉजीस्टीक्स प्रा. लि. या कंपन्यांवर छापे टाकले. या छाप्यामध्ये या तिन्ही कंपन्यांच्या मालकांकडे औषध विक्रीसाठी आवश्यक परवाना नसतानाही ते ऑनलाईनच्या माध्यमातून औषध विक्री करीत असल्याचे आढळले. औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ च्या तरतुदीनुसार या तिन्ही छाप्यांमध्ये १६ हजार ७०० रुपये किंमतीची औषधे जप्त करण्यात आली, तर ७ औषधांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. तसेच या तिन्ही कंपन्यांना औषध पुरवठा करणारे भिवंडी येथील वितरक मे. क्लाउड रिटेल प्रा.लि. कंपनीची तपासणी करून माहिती घेण्यात आली.

हेही वाचा >>>नायगाव बीडीडीच्या जागेवर ६५ मजली तीन इमारती ,पुनर्विकासाअंतर्गत विक्री घटकातील १,८०० घरांच्या कामाला अखेर सुरुवात

मुंबईतील औषध निरीक्षक प्रवीण राऊत यांनी मालाडमधील मे. स्कुटसी लॉजीस्टीक्स प्रा. लि. व सुनील गवळी यांनी कांदिवलीतील मे. भगवती स्टोर्स प्रा. लि. आणि ठाण्यातील औषध निरीक्षक राजश्री शिंदे यांनी मे. फोक्लो टेक्नोलॉजीस प्रा. लि. या कंपन्यावर जप्तीची कारवाई केली. तसेच औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर व जोसेफ चिरामल यांनी मे. क्लाउड रिटेल प्रा.लि. या वितरकाची तपासणी केली.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर, सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सह आयुक्त (बृहन्मुंबई) विजय जाधव, सहआयुक्त (कोकण विभाग) नरेंद्र सुपे, यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गुप्तवार्ता विभागाचे औषध निरीक्षक (गुप्तवार्ता) वि. आर. रवि, शशिकांत यादव, योगेंद्र पोळ, प्रशांत आस्वर यांनी कारवाईस मदत केली.

Story img Loader