आंबेडकरी समाजातून तीव्र प्रतिक्रिया; आयोजकांकडून आरोपांचे खंडन, केवळ जलपूजन कार्यक्रम केल्याचा दावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदार तळ्यातील पाण्याला स्पर्श करून मानवमुक्तीच्या लढय़ाला सुरुवात केली, त्या तळ्याच्या पाण्याचे ऐतिहासिक महाड सत्याग्रहाच्या वर्धापनदिनी ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेने केला असून, या कथित घटनेबद्दल आंबेडकरी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ब्राह्मण पुरोहिताकडून हे शुद्धीकरण करण्यात आल्याचे आनंदराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेचे म्हणणे आहे. आमदार गोगावले यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. जलजागृतीचा भाग म्हणून आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमांतर्गत चवदार तळ्यामध्ये केवळ जलपूजन केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठय़ावर पाण्याचा हक्क मिळावा, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सामाजिक क्रांतीच्या लढय़ाला सुरुवात केली होती. महाडचा सत्याग्रह म्हणून त्याची इतिहासात नोंद आहे. त्यावेळीही अस्पृश्यांनी तळे बाटविले म्हणून काही पुराणमतवाद्यांनी तळ्यातून १०८ घागरी पाणी बाहेर काढून त्यात गोमूत्र टाकून ते पाणी पुन्हा तळ्यात ओतून शुद्धीकरणाचा प्रकार केला होता. बाबासाहेबांची यंदा १२५वी जयंती असून, त्यानिमित्ताने देशभर कार्यक्रम केले जात असतानाच, ८९ वर्षांनंतर पुन्हा तळे शुद्धीकरणाचा प्रकार घडल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये असंतोष पसरला आहे.
मुंबईत १९८७-८८ मध्ये डॉ. आंबेडकर लिखित ‘रिडल्स ऑफ हिंदुइझम’ या पुस्तकावरून वाद पेटला होता. पुस्तकाच्या समर्थनार्थ आंबेडकरी अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी हुतात्मा चौक बाटला म्हणून मुंबईचे तत्कालीन महापौर व शिवसेनेचे नेते छगन भुजबळ यांनी हुतात्मा चौकाचे गोमूत्र शिंपून शुद्धीकरण केले होते. त्यावरून बराच वाद झाला होता. त्याच प्रकाराची पुनरावृत्ती पुन्हा करण्यात आली असल्याचा रिपब्लिकन सेनेचा आरोप आहे.
दर वर्षी २० मार्चला चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वर्धापनदिनी लाखाच्या संख्येने आंबेडकर अनुयायी महाडला जमतात. या वेळीही मोठय़ा संख्येने आंबेडकरी जनता उपस्थित होती. त्याचवेळी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष रमेश जाधव यांनी केला आहे. या संदर्भात गोगावले यांच्याशी संपर्क साधला असता, जलजागृतीचा भाग म्हणून १९ मार्चला शासकीय कार्यक्रमासाठी आपणास निमंत्रित करण्यात आले होते व तेथे चवदार तळ्यात जलपूजन झाल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. शुद्धीकरण केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. उलट महाडला येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी भोजन व अन्य व्यवस्था करण्यासाठी आपण जिल्हा परिषदेकडून एक लाख रुपयांची तरतूद करून घेतल्याचे ते म्हणाले. त्या कार्यक्रमाला महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी, अधीक्षक अभियंता व इतर कर्मचारीही उपस्थित होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
रिपब्लिकन सेनेने मात्र त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. जलजागृतीचा कार्यक्रम करायचा होता तर मग असा गुपचूप का केला, जाहीरपणे केला असता तर आंबेडकर अनुयायीयी त्यात सहभागी झाले असते, असे जाधव यांचे म्हणणे आहे. शासकीय कार्यक्रम होता तर मग जलपूजेसाठी फक्त ब्राह्मण पुरोहितच का, अन्य धर्मगुरूंना का बोलावण्यात आले नाही, असा त्यांचा सवाल आहे. याप्रकरणी गोगावले व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई
करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे.
शासन परिपत्रकात जलपूजनाचा उल्लेख नाही
राज्यात शासनस्तरावर १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत जलसंपदा विभागाने ११ फेब्रुवारीला व पाणीपुरवठा विभागाने २६ फेब्रुवारीला दोन स्वतंत्र परिपत्रके काढली. त्यात अवर्षण परिस्थितीमध्ये घरगुती वापरासाठी असलेले पाणी दीर्घकाळ टिकून राहण्याच्या दृष्टीने गावे, वाडय़ा, वस्त्यांमध्ये लोकांशी थेट संपर्क साधून त्यांच्यात जागृती निर्माण करावी, त्यासाठी आवश्यकतेनुसार चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करावीत, रस्त्यांच्या कडेला दर्शनी भागात पाणी बचतीचे व स्वच्छतेबाबतची घोषवाक्ये व माहिती ठळकपणे लिहावी, नाले व नद्यांचे प्रदूषण रोखणे, पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन, इत्यादी उपाययोजनांचे महत्त्व स्पष्ट करावे, मीटरद्वारे पाणीपुरवठा हा पाणी बचतीचा अंतिम उपाय आहे, त्याबाबतचे फायदे व गरज याबद्दल जलजागृती करावी, असे म्हटले आहे. त्यात कुठेही जलपूजनाच्या कार्यक्रमाचा समावेश नाही.