मुंबई : महाड येथील तळीयेमधील कोंढाळकरवाडीतील दरडग्रस्त ६६ कुटुंबियांना अखेर आज हक्काच्या पक्क्या घराचा ताबा मिळणार आहे. माणगाव येथील लोणेरे गावात आज दुपारी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना घरांची चावी देण्यात येणार आहे. त्यानंतर आजच सायंकाळी उर्वरित दरडग्रस्तांना चावी वाटप केले जाणार आहे. त्यामुळे आता ६६ दरडग्रस्तांची अडीच वर्षापासूनची घराची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.
कोंढाळकरवाडी येथे २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली. या दुर्घटनेत ६६ घरे गाडली गेली. तर ८७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर बाधित ६६ कुटुंबांपैकी २५ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी कंटेनरमध्ये स्थलांतर करण्यात आले. उर्वरित कुटुंबांनी आपल्या निवाऱ्याची व्यवस्था इतरत्र केली. या दुर्घटनेनंतर ६६ दरडग्रस्तांसह तळीयेतील धोकादायक परिसरातील १९७ कुटुंबियांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार म्हाडाच्या कोकण मंडळाने २६३ घरांचा प्रकल्प हाती घेतला. यातील ६६ दरडग्रस्तांची घरे अखेर आता बांधून पूर्ण झाली आहेत. आता या ६६ घरांचा ताबा आज संबंधितांना देण्यात येणार आहे. अडीच वर्षांनंतर आता २५ कुटुंबे कंटेनरमधून पक्क्या घरात जाणार आहेत.
हक्काचे छप्पर मिळाले पण गेलेल्या माणसांचे काय?
“आम्हाला आज हक्काचे घर मिळत आहे, याचा आनंद होत आहे. पण त्याहीपेक्षा आज अधिक दुःख होत आहे. घर मिळाले, हक्काचे छप्पर मिळाले पण गमावलेल्या माणसांचे काय? कुटुंबातील ते सदस्य कधीही परत येणार नाहीत. माझ्या दोन मुलांसह १३ जणांना मी गमावले आहे. आज त्यांच्या आठवणीने भरून येत आहे. अशीच परिस्थिती आज सगळ्यांची आहे”, तळीये येथील दरडग्रस्त सुनील शिरवाळे यांनी म्हटले आहे.