तरुण पिढी, त्यांच्या हाती असलेले स्मार्टफोन्स, इंटरनेटचा त्यांच्या आयुष्यातील वाढलेला वापर, या सर्व बाबी लक्षात घेत रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे अर्थसंकल्पात तिकीट प्रणालीत आधुनिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत फक्त मेल-एक्स्प्रेस अशा लांब पल्ल्यांच्या गाडय़ांची आरक्षित तिकिटे काढण्यासाठी इंटरनेटचा वापर होत होता. मात्र आता इंटरनेटच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म तिकीट आणि त्याचबरोबर अनारक्षित तिकिटेही काढता येणार आहेत. अनारक्षित तिकिटांच्या व्याख्येत उपनगरीय गाडय़ांची तिकिटेही मोडत असल्याने आता लोकल गाडय़ांची तिकिटे इंटरनेटवरून मिळणार का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. मात्र या निर्णयाची अमलबजावणी कशी करणार, असा प्रश्न अधिकाऱ्यांनाही पडला आहे.
तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी तिकीट प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ई-तिकीटांबाबत सुधारणा करण्याचे ठरवले आहे. सध्या प्रत्येक मिनिटाला २००० तिकिटे ई-तिकीट प्रणालीद्वारे काढली जातात. मात्र हीच संख्या आता ७२०० एवढी व्हावी, अशी सक्षम ई-तिकीट यंत्रणा राबवण्याचे रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. तसेच एकाच वेळी १ लाख २० हजार ग्राहक या प्रणालीचा लाभ घेऊ शकतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
याच तिकीट प्रणालीतील पुढील पाऊल म्हणून रेल्वेमंत्री गौडा यांनी आता प्लॅटफॉर्म आणि अनारक्षित तिकिटेही ऑनलाइन काढता येणे शक्य होणार असल्याचे जाहीर केले. अनारक्षित तिकिटांच्या व्याख्येत लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसह लोकल गाडय़ांची तिकिटेही येतात. त्यामुळे आता उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी निघण्याआधी ऑनलाइन तिकीट काढणे शक्य होणार का, असा प्रश्न प्रवासी करत आहेत. या तिकिटांची छापील प्रत अनिवार्य असेल की, मोबाइलवरील संदेशही दाखवणे शक्य होईल, असा प्रश्न पडला आहे.
स्थानक येण्याआधी अ‍ॅलर्ट कॉल!
लांब पल्ल्याच्या गाडय़ांनी प्रवास करताना रात्री आडनिडय़ा वेळी स्थानकांवर उतरायचे असल्यास कधी झोप लागली म्हणून किंवा कधी स्थानक आल्याचे समजलेच नाही म्हणून उतरायचे राहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रवाशांचा हा त्रास दूर करण्यासाठी रेल्वेने आता प्रवाशांना अ‍ॅलर्ट कॉल देण्याचा निर्णय घेतला आहे. आडनिडय़ा वेळी येणाऱ्या स्थानकांआधी प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवर हा कॉल येणार असून या कॉलद्वारे काही मिनिटांत तुमचे स्थानक येणार असल्याचे प्रवाशांना सूचित केले जाईल.
‘अ’ दर्जाच्या स्थानकांवर वायफाय सुविधा
रेल्वेने आधुनिकीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकत आता ‘अ+’ आणि ‘अ’ श्रेणीच्या स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, दादर, कल्याण, मुंबई सेंट्रल, चर्चगेट, अंधेरी, बोरिवली, पनवेल या स्थानकांवर लवकरच वायफाय सुविधा सुरू होणार आहे. महाराष्ट्राचा विचार करता नाशिक रोड, पुणे, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, मनमाड, भुसावळ, जळगाव, लोणावळा, अहमदनगर, दौंड, चंद्रपूर, वर्धा, मिरज, छत्रपती शाहू टर्मिनस अशा स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा