गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रकल्पांच्या निव्वळ घोषणांवरच भर देण्यात आला. याआधीच्या सरकारला तर, प्रकल्प जाहीर केल्यानंतर सभागृहात कडकडणाऱ्या टाळ्यांची जणू नशाच चढली होती. त्या नशेमुळे त्यांना रेल्वेच्या डबघाईला आलेल्या स्थितीची जाणीव असूनही भान राहिले नाही, असा टोला मारत सदानंद गौडा यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर कोरडे ओढले.
गेल्या तीस वर्षांत तब्बल एक लाख ५७ हजार ८८३ कोटींचें ६७६ प्रकल्प मंजूर झाले, पण त्यापैकी केवळ ३१७ प्रकल्प पूर्ण होऊ शकले. उरलेले ३५९ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक लाख ८२ हजार कोटींची गरज आहे. त्यामुळे, केवळ टाळ्या मिळविण्यासाठी नवे प्रकल्प मी जाहीर करणार नाही, असे गौडा यांनी स्पष्ट केले. सभागृहात टाळ्या मिळविण्यासाठी मीदेखील अनेक नवे प्रकल्प जाहीर करू शकेन पण तसे केल्याने अगोदरच मरणपंथाला लागलेल्या या रेल्वेवर अन्याय होईल, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या दहा वषाँच्या काळातील काँग्रेस आघाडी सरकारच्या रेल्वेबाबतच्या कारभाराचे आकडेवारीसह चित्र उभे करताना सदानंद गौडा यांनी रेल्वेच्या या स्थितीचा ठपकाच काँग्रेस आघाडीवर ठेवला. गेल्या दहा वर्षांत ६० हजार कोटीं रुपये खर्चाच्या ९९ नव्या रेल्वेमार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली, पण आजमितीस त्यापैकी जेमतेम एकच प्रकल्प पूर्ण झालेला असून उरलेले ९८ प्रकल्प गटांगळ्या खात आहेत, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. चार प्रकल्प तर तीस वर्षांहूनही अधिक काळापासून रखडलेलेलच आहेत, अशा स्थितीत नवे प्रकल्प जाहीर करणे म्हणजे आणखी दिरंगाईला निमंत्रण ठरेल, असा दावाही त्यांनी केला.

Story img Loader