केंद्र सरकारने रेल्वे भाडेवाढीचा कटू निर्णय घेतल्याने त्याविरोधात शनिवारी देशभर उद्रेक झाला. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलने केली. अनेक ठिकाणी ‘रेल्वे रोको’ आंदोलन केल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईत रेल्वेच्या मासिक पासच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने ‘रालोआ’चा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनीही या दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
निर्णय मागे घेण्याची सेनेची मागणी
मुंबईतील भाजपचे खासदार रेल्वेदरवाढीचे समर्थन करत असताना शिवसेना खासदारांनी मात्र विरोधाची भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने केलेली रेल्वे दरवाढ मागे घ्यावी अथवा ती कमी करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात येईल, असे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर लवकरच सर्व खासदारांची एक बैठक आयोजित करून या संदर्भातील पुढील व्यूहरचना निश्चित केली जाईल, असे खासदार गजानन कीर्तीकर यांनी जाहीर केले. खासदार राहुल शेवाळे यांनी तर रेल्वेच्या मुंबईतील मालमत्तांचा व्यावसायिक वापर करून तोटा भरून काढता येईल आणि दरवाढ टाळता येईल, असा उपाय सुचवला.
प्रवासी भाडेवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. भाडेवाढीऐवजी प्रवाशांच्या सोयी-सुविधांवर अधिक लक्ष द्यायला हवे. भाडेवाढ अपरिहार्य असेल तर त्याप्रमाणात सेवेचा दर्जा वाढायला हवा तरच जनतेला काँग्रेसचे सरकार आणि रालोआ सरकार यांच्यातील फरक समजेल.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा