पालिकेच्या क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यास मध्य रेल्वेला परवानगी नाही आणि कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सुविधा रेल्वेकडे उपलब्ध नाही, अशा कचाटय़ात रुळांमध्ये टाकला जाणारा शेकडो किलो कचरा थेट वाशी खाडीला अर्पण केला जात आहे. अनेक उपाययोजनांद्वारे विशेष करून प्रत्येक स्थानकावर स्वच्छतेविषयी उद्घोषणा करूनही रेल्वेमार्गावरील कचऱ्याला जराही खळ नाही. उलट फलाटांवरील प्लास्टिक बाटल्या, कागदाचे कपटे, खाद्यपदार्थाची आवरणे, रबरी चपला, चहा पिण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे पेले रुळांवर लोटले जात आहेत. हा कचरा रोज गोळा केला जातो; परंतु तो नंतर वाशी खाडीच्या दलदलीच्या भागात फेकला जात आहे. त्यामुळे सागरकिनाऱ्यावरील परिसंस्थेवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेकदा रेल्वेखाली येणाऱ्या कुत्रा-मांजर यांसारख्या प्राण्यांचे मृतदेहही रेल्वेमार्गालगतच पडून असतात. हा कचरा उचलण्याचे कंत्राट रेल्वेने कंत्राटदारांना दिले आहे. त्यानुसार हा कचरा दिवसा उचलून तो प्लॅस्टिकच्या गोणींमध्ये भरला जातो. दर दिवशी अशा दीड ते अडीच हजार कचऱ्याच्या गोणी गोळा केल्या जातात. रात्री रेल्वेची ‘कचरा गाडी’ विशेष ब्लॉकदरम्यान ठरावीक स्थानकांदरम्यान हा कचरा गोळा करते. आठवडय़ातील एक दिवस ही गाडी वाशी स्थानकाजवळ खाडीच्या बाजूला थांबवून त्यातील कचऱ्याच्या गोणी बाहेर टाकल्या जातात.
मानखुर्दहून वाशीला जाताना खाडी ओलांडल्यावर खाडीचे पाणी बरेच आत शिरले आहे. येथे दलदल असून भरतीच्या वेळी पाणी आत शिरते. रेल्वेमार्गासाठी या भागात मातीचा उंच ढिगारा तयार करण्यात आला आहे. मात्र भरतीच्या वेळी ही माती वाहून जाऊ नये, यासाठी या सखल भागात भराव म्हणून या गोणी टाकल्या जातात, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेचा कचरा पालिकेच्या क्षेपणभूमीवर का टाकला जात नाही, असे विचारले असता, तशी परवानगी रेल्वेला नाही, असे उत्तरही रेल्वे प्रशासनाकडून मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रक येत नाही..
रेल्वेमार्गावरील कचरा उचलण्यासाठी ट्रक रेल्वेच्या हद्दीत येऊ शकत नाहीत. त्यासाठी आम्हाला आमचीच गाडी ‘कचरा गाडी’ बनवून चालवावी लागते. त्यामुळे हा कचरा क्षेपणभूमीपर्यंत घेऊन जाणेही अडचणीचे आहे. परिणामी रेल्वेमार्गालगतच हा कचरा टाकला जातो, असेही या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rail garbage in vashi creek