मुंबई : शाळा सुरू होण्यापूर्वीचा म्म्शेवटचा रविवार असल्याने पालक आणि मुले शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्याने पालकांसह मुलांचे ‘मेगाहाल’ झाले. मध्य रेल्वेच्या रविवारच्या वेळापत्रकामुळे बहुतांश लोकल फेऱ्या रद्द होत्या. तसेच रविवारी अनेक धीम्या स्थानकात लोकल थांबा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यासह प्रवाशांना अनियोजित वेळापत्रकासह लोकलमधील गर्दीचा त्रास सहन करावा लागला.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा १५ जून २०२३ पासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच्या शेवटच्या रविवारी ११ जून रोजी अनेक पालक आपल्या मुलांसोबत दादर, कुर्ला, ठाणे, घाटकोपर, क्रॉफर्ड मार्केट यासारख्या ठिकाणी दप्तर, पुस्तके, वह्या यांसह इतर शालेय साहित्य खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. मात्र, रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक होता. त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्याने माटुंगा, चिंचपोकळी, करी रोड, सँडहस्र्ट रोड या स्थानकात लोकल थांबा नव्हता. परिणामी, या स्थानकातील प्रवाशांना पायपीट करून अथवा टॅक्सीने जाऊन इच्छित स्थानक गाठावे लागले.
दादर येथील बाजारातून शालेय साहित्याची खरेदी करताना मोठय़ा संख्येने पालक वर्ग दिसून येत होता. चार ते पाच डझन वह्या, मार्गदर्शके, कंपास पेटी व इतर शालेय साहित्य घेऊन लोकल प्रवास करताना पालकांचे प्रचंड हाल झाले. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप- डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत; तसेच सकाळी १०.०१ ते दुपारी ३.५३ दरम्यान ट्रान्स हार्बरमार्गावर ठाणे ते पनवेल लोकल सेवा बंद होती. त्यामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना एसटी तसेच अन्य पर्यायी वाहतुकीचा वापर करून इच्छितस्थळ गाठावे लागले. तर अनेकांनी ब्लॉक संपण्याची प्रतीक्षा केली.