मुंबई : टिटवाळा स्थानकात प्रवाशांनी सकाळी ८.३० च्या सुमारास ‘रेल रोको’ आंदोलन केल्यामुळे मध्य रेल्वेवरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
हेही वाचा… बुलेट ट्रेनच्या १३५ किलोमीटर मार्गाच्या कामांसाठी निविदा; शिळफाटा ते झारोळी मार्गाच्या कामाला गती
कसारा येथून सीएसएमटीला जाणारी लोकल सकाळी ८.३० वाजता टिटवाळा स्थानकात आली. ही लोकल काही तांत्रिक कारणास्तव सकाळी ८.१८ ऐवजी विलंबाने स्थानकात पोहोचली आणि त्यामुळे प्रवाशांनी स्थानकात रेल रोको केल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. सीएसएमटीला जाणारी ही लोकल प्रवाशांनी पुढे जाऊ न देता रुळावर ठाण मांडून आंदोलन सुरू केले. त्यामुळे लोकल वेळापत्रक विस्कळीत झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांची समजूत काढल्यानंतर सकाळी ८.५१ वाजता लोकल पुढे रवाना झाली. मात्र या घटनेमुळे लोकल विलंबाने धावत आहेत.