ठाण्यातील यार्डाची पुनर्रचनेचे काम अतिशय गुंतागुंतीचे असल्याने साधारणपणे ३६ तास त्यासाठी लागणार होते, पण प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा या उद्देशाने हे काम अवघ्या १६ तासांत पूर्ण करण्याचा चंग रेल्वे अधिकाऱ्यांनी बांधला. पण ते वास्तवात उतरू न शकल्याने वाहतुकीचा बोजवारा तर उडालाच; परंतु सहा प्रवाशांना प्राणही गमवावा लागला, तसेच लाखो प्रवाशांना नाहक हाल सोसावे लागल्याचे वास्तव समोर आले आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावरील सिग्नल यंत्रणेचे नियंत्रण करणाऱ्या फलाट क्रमांक पाच व सहा दरम्यानच्या मुख्य केबिनचे स्थलांतर फलाट क्रमांक एकवर करणे, मुंबई व कळवा या दोन्ही दिशांनी ठाणे रेल्वे स्थानकाकडे येणारे व जाणारे रूळ एकमेकांशी जोडणाऱ्या सांध्यांच्या रचनेत बदल व रेल्वेमार्गातील या बदलानुसार ओव्हरहेड वायरिंगांमध्ये बदल, सिग्नल यंत्रणेतही त्यानुरूप बदल व विस्तार अशी कामे हाती घेण्यात आली. या कामांसाठी रविवारी सकाळी १० ते सोमवारी पहाटे २ असा १६ तासांचा मुख्य मेगाब्लॉक घेण्यात आला. रेल्वे यंत्रणेच्या या कामामुळे ठाण्यातील फलाट क्रमांक तीन व चारवरून मुंबईकडे जाण्यासाठी एकावेळी लोकल सुटू शकेल. शिवाय मुंबईकडून फलाट क्रमांक एककडे गाडी जात असताना फलाट क्रमांक दोनकडे जाणारी गाडी सध्या थांबवावी लागते. आता त्याची गरज पडणार नाही. शिवाय सांध्यांच्या रचनेतील बदलामुळे त्यावरून जाताना रेल्वेचा वेग वाढेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि वेळापत्रकानुसार गाडय़ा धावण्याचे उद्दिष्ट गाठण्यात मदत होईल.
कमी वेळेत काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याने गोंधळ झाला, अशी माहिती ठाणे येथील एका रेल्वे कर्मचाऱ्याने दिली. त्यातून सोमवारी सकाळपर्यंत सांध्यांची जागा, रचना बदलण्याचे काम झाले होते, पण त्यानुसार ओव्हरहेड वायर लावण्याचे काम अपूर्ण राहिले, अशी माहितीही समोर आली.
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर यांच्याकडे विचारणा केली असता, नियोजनात त्रुटी राहिल्याची कबुली त्यांनी दिली. हे काम दोन-चार टप्प्यांत मेगाब्लॉक घेऊन करता आले असते, पण त्यामुळे दरवेळी लोकल वाहतूक बंद होऊन प्रवाशांना त्रास झाला असता. ते टाळण्यासाठी लवकर वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट होते, असे ते म्हणाले.

Story img Loader