मुंबई : अत्यावश्यक कारणांसाठी किंवा आपत्कालीन घटनेवेळी उपनगरीय आणि मेल, एक्स्प्रेसमध्ये आपत्कालीन साखळी (अलार्म चेन पुिलग)ची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, प्रवासी अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी आपत्कालीन साखळी ओढतात. यामुळे लोकल, मेल, एक्स्प्रसचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. मे २०२३ मध्ये मध्य रेल्वेवर ९४१ आपत्कालीन साखळी ओढण्याच्या घटना घडल्या असून, ७११ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून २ लाख ७१ हजार रुपयांची दंडवसुली केली.
करोना काळानंतर यंदा लग्नसराई आणि उन्हाळय़ाच्या सुट्टय़ामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली होती. प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेकडून उन्हाळी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात आल्या. मात्र याचवेळी आपत्कालीन साखळी खेचण्याच्या घटनेत वाढ झाली. प्रवाशांना अपेक्षित स्थानकात उतरण्यासाठी आपत्कालीन साखळी खेचण्याचे प्रकार मध्य रेल्वेच्या निदर्शनास आले. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार अनावश्यक किंवा गैरवाजवी कारणांसाठी आपत्कालीन साखळी खेचणे दंडनीय गुन्हा आहे. त्यानुसार मे महिन्यात अशा ९४१ घटना घडल्या. यापैकी सुमारे ७११ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ७१ हजार २०५ रुपये दंड आकारणी करण्यात आली.
वेळेवर पोहचण्याचे आवाहन
लोकल, लांब पल्ल्याच्या गाडय़ामधील आपत्कालीन साखळी खेचल्याने फक्त त्या विशिष्ट रेल्वेच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाही. तर, त्या रेल्वेच्या मागून धावणाऱ्या गाडय़ांवरही परिणाम होतो. प्रवाशांनी त्यांची इच्छित गाडय़ा सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस किंवा स्थानकावर पोहचण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.