सुट्टय़ांच्या मोसमात दलालांकडून प्रवाशांची फसवणूक
रेल्वेच्या तिकीट आरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या आयआरसीटीसीचे संकेतस्थळ हॅक झाल्याचे वृत्त रेल्वेने सपशेल फेटाळले असले, तरी या अधिकृत संकेतस्थळावरून तिकिटे आरक्षित करणाऱ्या दलालांचे प्रमाण कमी झालेले नाही. सुटय़ांच्या मोसमात तर या दलालांनी काढलेल्या ई-तिकिटांचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दलालांमार्फत काढलेली तिकिटे बनावट तिकिटे मानण्यात येत असून केवळ मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये अशी ११ हजारांहून अधिक तिकिटे रेल्वे सुरक्षा दलाने कारवाईत हस्तगत केली आहेत.
रेल्वेच्या नियमाप्रमाणे १२० दिवस आधीपासून प्रवासाचे आरक्षण करणे बंधनकारक आहे. या नियमामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय होत असली, तरी दलालांचे चांगलेच फावले आहे. दलाल ई-तिकिटे काढून ती नंतर गरजू प्रवाशांना चढय़ा दरांत विकत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र या तिकिटांसाठी देण्यात आलेली प्रवाशांची माहिती आणि अन्य तपशील चुकीचा असल्याने ही तिकिटे बनावट मानली जातात. २०१६ या वर्षांतील पहिल्या चार महिन्यांत बनावट तिकिटांच्या ५६ घटना पकडण्यात आल्या.
या ५६ घटनांपैकी ३६ घटना गेल्या दोन महिन्यांत घडल्या आहेत. त्यात मार्च महिन्यात घडलेल्या दहा घटनांमध्ये एकूण १२ जणांवर कायदेशीर खटला चालवण्यात आला. या १२ जणांनी ४.५९ लाख रुपये मूल्याची १०,७०१ तिकिटे आरक्षित केली होती. तर एप्रिल महिन्यात २६ घटनांमध्ये २७ जणांना अटक करण्यात आली. या २७ जणांकडून ३६० तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. या तिकिटांचे मूल्य ९.१९ लाख एवढे आहे.
प्रवाशांनी दलालांकडून तिकिटे विकत घेऊ नयेत, असे आवाहन वारंवार केले जाते. सुटय़ांच्या मोसमात दलालांकडून तिकीट विकत घेण्याचे प्रमाण वाढते, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. रेल्वे सुरक्षा दल अशा दलालांचा बीमोड करण्याचा प्रयत्न नेहमीच करते. त्यासाठी आता एक विशेष मोहीमही सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांनी दलालांकडून तिकीट विकत घेतले, तरी त्या तिकिटांवर त्यांना प्रवास करताना प्रचंड अडचणी उद्भवू शकतात, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा