मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी जुलै १९९९ मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई रेल्वे विकास महामंडळाची स्थापना केली. मध्ये आणि पश्चिम रेल्वेकडे असलेली आर्थिक अडचण सोडविण्यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून निधी उभा करणे आणि त्याचवेळी वेगवेगळ्या कामाची पूर्तता करणे महत्त्वाचे होते. तीन टप्प्यामध्ये महामंडळाने मुंबईच्या नागरी वाहतूक प्रकल्पाच्या विकासाची कामे हाती घेतली. मात्र तिसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात होत असताना अद्यापही अनेक कामे रेंगाळली आहेत. परिणामी मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वाहतुकीचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पहिल्या टप्प्यामध्ये माहीम आणि सांताक्रूझ दरम्यान पाचवा मार्ग, बोरिवली आणि विरार दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग तसेच कुर्ला आणि ठामे दरम्यान पाचवा-सहावा मार्ग हे टप्पे ठरविले होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावा मार्ग, कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान पाचवा-सहावा मार्ग, ठाणे आणि दिवा दरम्यान पाचवा-सहावा मार्ग आणि हार्बरचा मार्ग अंधेरी ते गोरेगावपर्यंत वाढविणे.
महामंडळाच्या अनेक कामांना जागतिक बँकेकडून निधीचा पुरवठा करण्यात आला असला तरी अनेकदा निधी अभावी कामे रेंगाळत असून प्रकल्पांची मुदत पुढे जात आहे. मात्र त्याचा पाठपुरावा करण्यास कोणी तयार नाही. रेल्वे दरवेळी महामंडळाकडेबोट दाखवते तर आता जागतिक बँकेनेही महामंडळ तसेच रेल्वेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्यामुळे  हात आखडता घेतला आहे. परिणामी रेल्वेच्या जागांचा व्यापारी विकास करून निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.पूर्वीच्या दोन टप्प्यातील सर्व कामे पूर्ण होण्यापूर्वीच रेल्वेने तिसऱ्या टप्प्यातील अनेक कामांची घोषणा करून प्रवाशांच्या अपेक्षा वाढविल्या आहेत. रेल्वे मार्गांचे आधुनिकीकरण करताना आवश्यक असलेल्या सर्व कामांची पूर्तता झाली किंवा नाही याची कोणतीही तपासणी केली नसल्याचे आढळून येत आहे. कोणत्याही प्रकल्पातील वास्तवदर्शी अडचणी अगोदर जाणून घेण्यापूर्वीच त्यांची घोषणा करणे, प्रकल्प सुरू झाल्यावर तो अर्धवट पूर्ण करणे यामुळे सध्या रेल्वेच्या सर्व प्रकल्पांची कामे अर्धवट अवस्थेत राहिली आहेत.

Story img Loader