सुरक्षा, प्रवासी सुविधा, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या चार घटकांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी भारतीय रेल्वेवर २६ मे ते ९ जून या कालावधीत होणाऱ्या ‘रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडय़ा’ची सुरुवात मंगळवारी झाली. रेल्वेचा कारभार गतिमान करण्यासाठी आयोजित या पंधरवडय़ात रेल्वेच्या सर्वच विभागांनी आळस झटकून कामाला लागावे, असे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५० गाडय़ांना १०० अतिरिक्त डबे
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात एकाही नव्या गाडीची घोषणा न करणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदा रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारण्यावर भर दिला आहे. मात्र प्रवाशांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेने तब्बल ५० गाडय़ांना १०० नवे डबे जोडले आहेत.

आठ तात्काळ विशेष गाडय़ा
मध्य रेल्वेवर तात्काळ विशेष गाडय़ांना मिळालेला प्रतिसाद पाहता आता काही प्रीमियम गाडय़ांनाही तात्काळ विशेष गाडय़ांचा दर्जा देण्यात आला आहे. या गाडय़ा मुंबईहून नागपूर, पटना, गोरखपूर, वाराणसी, तिरूनेवेल्ली आणि एर्नाकुलम येथे रवाना होणार आहेत.

प. रेल्वे फेसबुक व ट्विटरवर
या पंधरवडय़ाचे निमित्त साधून पश्चिम रेल्वेने थेट प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वे आता फेसबुक आणि ट्विटर या दोन सोशल नेटवर्किंग साइट्सवर पदार्पण करणार आहे. प्रवासी त्यांच्या तक्रारी, सूचना आदी या पेजवर नोंदवू शकणार आहेत.

ओव्हरहेड वायरची तपासणी
मुंबईत होणाऱ्या ओव्हरहेड वायरमधील बिघाडांच्या घटना लक्षात घेऊन रेल्वेच्या विद्युत विभागाला या ओव्हरहेड वायर सातत्याने तपासण्याची सूचना रेल्वे बोर्डाने दिली आहे. तसेच या पंधरवडय़ात सर्वच विभागांनी रेल्वेमार्गाची देखभाल-दुरुस्ती योग्य प्रकारे करावी, अशा सूचना केल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway board give orders to all regional departments